10th-12th Exam : दहावी-बारावी परीक्षेला ‘सरमिसळ’ पद्धत; पुणे विभागीय मंडळातर्फे अंमलबजावणी | पुढारी

10th-12th Exam : दहावी-बारावी परीक्षेला 'सरमिसळ' पद्धत; पुणे विभागीय मंडळातर्फे अंमलबजावणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागातील दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये आता विद्यार्थ्यांची सरमिसळ करण्याची पद्धत वापरली जाणार आहे. या पद्धतीचा वापर फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार्‍या परीक्षेपासून केला जाणार असून, या पद्धतीमुळे परीक्षेमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांना चाप लावणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्यातील नऊ विभागीय मंडळांद्वारे दहावी, बारावीची लेखी परीक्षा एकाच वेळी घेण्यात येते.

यात पुणे वगळता अन्य विभागांत शहरी भागात आणि ग्रामीण भागात एकाच गावात दोन किंवा दोनपेक्षा अधिक परीक्षा केंद्रे असल्यास या केंद्रांवरील विद्यार्थी सरमिसळ करून विद्यार्थ्यांना संबंधित परीक्षा केंद्रावर बसविले जाते. त्यामुळे गैरप्रकार रोखणे शक्य होते. पुणे विभागातही पूर्वी ही ‘सरमिसळ’ पद्धत राबविण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव गेल्या सहा-सात वर्षांपासून ही पद्धत बंद झाली होती. आता ही पद्धत पुन्हा लागू करण्याबाबत पुणे विभागीय मंडळाने पाठविलेल्या प्रस्तावाला राज्य मंडळाने मान्यता दिली तसेच त्यानुषंगाने काही सूचनाही दिल्या आहेत.

सरमिसळ पद्धत दोन किंवा दोनपेक्षा जास्त केंद्रसंख्या असलेल्या ठिकाणीच राबवावी, पहिल्या टप्प्यात तालुका आणि मोठ्या शहरातील परीक्षा केंद्रांवरच विद्यार्थ्यांची सरमिसळ पद्धतीने बैठकव्यवस्था करावी, प्रत्येक केंद्रावरची विद्यार्थ्यांची बैठकव्यवस्थेची क्षमता लक्षात घेऊन कार्यवाही करावी, विद्यार्थिसंख्येनुसार सरमिसळ केल्यामुळे विद्यार्थ्यांना दूरवरच्या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागणार नाही, याची खबदारी घ्यावी, कोणत्याही केंद्राची तक्रार येणार नाही आणि ऐनवेळी बैठकव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, याची दक्षता घ्यावी, विद्यार्थ्यांच्या बैठकव्यवस्थेबाबत प्रवेशपत्रावर परीक्षास्थळांची नोंद अचूक होईल, याची दक्षता घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी पुणे विभागीय मंडळाला दिल्या आहेत.

पुणे विभागीय मंडळातर्फे सरमिसळ पद्धत लागू केली जाणार आहे. या पद्धतीमुळे परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखणे शक्य होईल.

– औदुंबर उकिरडे, सचिव, पुणे विभागीय मंडळ

हेही वाचा

Pune Navratri 2023 : पुण्यातील देवीच्या मंदिरांमध्ये विधिवत होणार घटस्थापना

Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणातील अभिषेक बलकवडेच्या घरातून तीन किलो सोने हस्तगत

IND vs PAK : भारताकडून विजयाचे घट बसवायची अपेक्षा

Back to top button