Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणातील अभिषेक बलकवडेच्या घरातून तीन किलो सोने हस्तगत | पुढारी

Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणातील अभिषेक बलकवडेच्या घरातून तीन किलो सोने हस्तगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्स तस्करी प्रकरणाने संबंध राज्यात खळबळ उडाली असून, याप्रकरणातील अटकेत असलेल्या संशयितांच्या घरातून कोट्यावधींचे घबाड पोलिसांकडून जप्त केले जात आहे. या प्रकरणातील संशयित ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला पुणे पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केल्यानंतर त्याचासोबती अभिषेक बलकवडे याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांनी अभिषेक याच्या नाशिकमधील घराची झाडाझडती घेतली असता, तब्बल तीन किलो सोने जप्त केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (Nashik Drug Case)

भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे याला पुणे पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केल्यानंतर त्यांना पुण्यात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. पोलिसांनी अभिषेक बलकवडे याच्या नाशिक येथील घरावर छापा टाकून तब्बल पावणे दोन कोटींचे तीन किलो सोने जप्त केले आहे. पुणे ड्रग्स तस्करी प्रकरणी मुख्य संशयित आरोपी ललित पाटील हा अद्यापही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून, तो नेपाळला पळून गेल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नाशिक येथील ड्रग्स बनवायचा कारखाण्यावर छापा टाकून हा कारखाना चालवणारा ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे हे फरार झाले होते. पुणे पोलिसांनी या दोघांना नेपाळ सीमेवरून अटक केली होती. त्याना पुणे न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याना १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या दोघांची चौकशी सुरू असून, ड्रग्स तस्कर प्रकरणातील मोठी टोळी उघड होण्याची शक्यता आहे. (Nashik Drug Case)

फॉर्म्युला विक्रीच्या तयारीत

ललित पाटील हा ड्रग विक्रीचे नेटवर्क सांभाळत होता, तर भूषण हा केमिकल अभियंता असल्यामुळे त्याला मेफेड्रोन तयार करण्याचा फॉर्म्युला माहित होता. ड्रग विक्रीबरोबरच ललित मेफेड्रोन विक्री करण्याच्या तयारीत होता. मोठी रक्कम घेऊन तो मुंबईच्या काही लोकांना प्रशिक्षण देखील देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ड्रगच्या पैशाची सोन्यात गुंतवणूक

अभिषेक ड्रग विक्रीतून आलेला पैसा सोन्यात गुंतवायचा. पेशाने अभियंता असलेल्या अभिषेकने ड्रगच्या पैशातून स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचाही पोलिसांना संशय आहे. दरम्यान, पुणे पोलीस बुधवारी रात्रीच त्याला घेवून नाशिकला आले होते. यावेळी दोन सोन्याच्या विटा आढळून आल्याचेही समजत आहे.

हेही वाचा :

Back to top button