पुणे; पुढारी वृत्तसेवा : सहजसोप्या स्टेप्समधून दांडिया-गरबाबद्दल झालेली माहिती… नृत्यदिग्दर्शकांनीही कस्तुरींकडून करून घेतलेली जोरदार तयारी आणि उत्साहात दांडिया-गरबाचे कस्तुरींनी घेतलेले प्रशिक्षण… अशा धम्माल वातावरणात 'पुढारी कस्तुरी क्लब' आयोजित गरबा – दांडिया प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. युनिक गरबा ग्रुपने घेतलेल्या या कार्यशाळेत कस्तुरी सदस्यांनी हिरिरीने सहभाग घेतला आणि आत्मविश्वासाने दांडिया- गरबाचे धडे घेतले. या वेळी प्रत्येकजणीचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
'पुढारी कस्तुरी क्लब'मार्फत नेहमीच कस्तुरी सदस्यांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे ही अनोखी कार्यशाळा घेण्यात आली. नवरात्रौत्सव जवळ आल्याने दांडिया-गरबाची तयारी तर हवीच… त्यासाठी खास कस्तुरी सदस्यांसाठी घोरपडे पेठेतील डी. जी. बालगुडे जिममध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. पुण्यातील सर्व विभागांतून कस्तुरी कार्यशाळेसाठी आल्या होत्या. सहजसोप्या स्टेप्समधून कस्तुरींना दांडिया-गरबा नृत्यप्रकार शिकविण्यात आला आणि ग्रुपमधील नृत्यदिग्दर्शकांनी दांडिया-गरबाबद्दल माहिती देत कस्तुरींना विविध स्टेप्सही शिकविल्या.
या कार्यशाळेमुळे दांडिया-गरबा नृत्य करण्याचा आत्मविश्वास वाढल्याच्या प्रतिक्रिया कस्तुरी सदस्यांनी व्यक्त केल्या. या कार्यशाळेला संजीवनी बालगुडे यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात होणाऱ्या दांडिया-गरबाच्या कार्यक्रमासाठी कस्तुरी सदस्यांची पूर्वतयारी झाली आणि त्यांनी गरबावर थिरकण्याचा आनंदही घेतला.
आमची दहा जणांची टीम दांडिया-गरबा शिकवण्यासाठी कार्यशाळेत सहभागी झाली होती. कस्तुरींचा उत्साह पाहून खूप आनंद झाला. 'पुढारी कस्तुरी क्लब'साठी नेहमीच आम्ही अशा कार्यशाळा आयोजित करू.
– विजय ओसवाल, युनिक गरबा ग्रुप, पुणे
कस्तुरी क्लबसोबत मी अनेक वर्षे काम करत आहे. महिलांसाठी असे उपक्रम करायला आवडतात, त्यामुळे क्लबमार्फत घेण्यात येणार्या उपक्रमांमध्ये माझा नेहमी सहभाग असतो.
– संजीवनी बालगुडे
हेही वाचा