Pune Cyber Crime : 66 लाखांवर डल्ला; सायबर चोरट्यांना बिहारमधून बेड्या | पुढारी

Pune Cyber Crime : 66 लाखांवर डल्ला; सायबर चोरट्यांना बिहारमधून बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोथरूड येथील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील अकाउंट विभागात फोन, मेसेज करून कंपनीचा संचालक बोलत असल्याचे सांगून 66 लाख 41 हजार 522 रुपयांचा गंडा घालणार्‍या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी बिहार येथून बेड्या ठोकल्या. बेलरी (वय 21), कामरान इम्तियाज अन्सारी (वय 23, दोघेही रा. इजमायली, पो. लखाडी दरगाह, ता. बहरिया, ता. सिवान, बिहार) यांना येथून अटक केली आहे. यापूर्वी बिशाल कुमार भरत (वय 21, रा. लकरी खुर्द, सिवान, बिहार) या आरोपीला अटक करण्यात आली होती.

या आरोपींकडून 8 मोबाईल, 36 सिम, 19 एटीएम, 2 चेकबुक जप्त करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या आरोपींकडून 1 गावठी कट्टा आणि 6 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. फिर्यादी हे कोथरूड भागात एका बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीच्या कार्यालयात अकाउंट विभागात काम करतात. सायबर चोरटयांनी ऑफिसच्या फोनवर संपर्क करत कंपनीचा संचालक बोलत असल्याचे सांगून विविध बँक खात्यांत 66 लाख 41 हजार 522 रुपये पाठवण्यास भाग पडून आर्थिक फसवणूक केली होती.

यापूर्वी बिशाल कुमार भरत याला लकडी दरगाह येथून अटक करण्यात आली होती. सायबर चोरटयांनी वापरलेले मोबाईल, इमेल आयडी, पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंक, एटीएम मशिनमधील सीसीटीव्ही फुटेज आणि बँक खात्यांचा व्यवहार तपास करून सायबर चोरट्याचा हा बिहारमधील सिवान जिल्ह्यातील इजमाली येथील असल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानुसार सायबर पोलिसांचे एक पथक पाठवण्यात आले होते. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात, अंमलदार दत्तात्रय फुलसुंदर, अश्विन कुमकर, प्रवीणसिंग राजपूत यांच्या पथकाने केली.

आरोपींवर अन्य गुन्हे…

बिहार येथून अटक करण्यात आलेल्या सायबर चोरट्यांनी पुण्यातील अजून एका व्यक्तीची 40 लाखांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच या सायबर चोरट्यांनी हैद्राबाद येथील एकाची आर्थिक फसवणूक केली आहे. याचबरोबर या आरोपींवर पंजाबमध्ये कलम 307 चा गुन्हा दाखल आहे.

अशी होती फसवणुकीची पद्धत

सायबर चोरटे गुगलवर सर्च करून कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचे नंबर मिळवीत होते. यानंतर त्या अधिकार्‍याचा फोटो वापरून मेसेज करून आपण एका महत्त्वाच्या मिटिंगमध्ये असल्याचे सांगून तत्काळ काही रक्कम पाठवण्यात यावी, असा मेसेज करून फसवणूक करण्याची पद्धत सायबर चोरटे वापरत होते.

पोलिसांनी लढवली शक्कल

सायबर चोरट्यांनी गावात वॉच टॉवर उभे केले होते. गावात नवीन कोणी येत तर नाही ना, यावर हे लक्ष ठेवून असायचे. यामुळे या वेळी कारवाई करतांना पुणे पोलिसांनी नवीन शक्कल लढविली होती. आरोपींना ओळखायला येऊ नये म्हणून दाढी वाढवूनच, थ—ी फोर्थ-शर्ट घालून रात्री 8 वाजता गावात जाऊन आरोपींना बेड्या ठोकल्या.

हेही वाचा

Ajit Pawar : पुणे जिल्हा बँकेत युपीआय सेवा सुरु; अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ

आठव्या वेतन आयोगापुढील आव्हाने

दरवर्षी बांधला-तोडला जाणारा पूल!

Back to top button