दरवर्षी बांधला-तोडला जाणारा पूल! | पुढारी

दरवर्षी बांधला-तोडला जाणारा पूल!

कॅम्पाँग : जगभरात अशा काही गोष्टी आहेत, ज्यावर विश्वास ठेवणेदेखील कठीण असते. एक पूल देखील असाच आहे, जो खूपच अजब आहे. आता पूल तयार करताना किती वेळ लागतो, हे सर्वश्रुत आहेच. कित्येक वर्षांची मेहनत त्यामागे असते. पण, एक पूल असा आहे की, जो दरवर्षी तयार केला जातो आणि दरवर्षी तोडलादेखील जातो. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत आली आहे. आता याचे कारणही असेच आहे की, ते पाहता पूल तयार करणे-तोडणे योग्यच वाटेल.

अम्युझिंग प्लॅनेट वेबसाईटच्या अहवालानुसार, पूर्व कंबोडियाच्या मेकाँग नदीवर हा अनोखा पूल उभारला जातो. बांबूपासून हा पूल तयार केला जातो. जवळपास 3300 फूट लांबीचा हा पूल कोह पेन या बेटाला कॅम्पाँग चॅम या शहराला जोडतो. यात 50 हजार बांबूंचा समावेश केला जातो. आता असा प्रश्न उपस्थित होईल की, हा पूल इतका लांब असेल, तो उभारणे इतके कठीण असेल आणि त्यात हजारो बांबू लागत असतील तर त्याला दरवर्षी तोडले का जाते?

याचे कारण आहे इथले हवामान. उन्हाळ्याच्या दिवसात मेकाँग नदीतील पाण्याची पातळी खूपच घटते. ही पातळी इतकी घटते की, तिथे नाव सुद्धा चालत नाही. अशावेळी येथील लोक या नदीवर पूल उभा करतात, जेणेकरून कोह पेन बेटावरील लोक सहजपणे शहरात येऊ शकतील. येथे पावसाळा मे ते नोव्हेंबर या कालावधीत असतो. हा मोसम सुरू होण्यापूर्वीच हा पूल तोडला जातो. कारण, एकदा पाणी वाढल्यानंतर त्यामुळे हा पूल तुटू शकतो. पाणी वाढल्यानंतर लोक नावेनेही प्रवास करू शकतात. पूल तोडल्यानंतर त्यातील लाकडे अन्य कामांसाठी उपयोगात आणली जातात.

आश्चर्य म्हणजे मागील अनेक वर्षांपासून हा पूल बांधण्याचे आणि तोडण्याचे काम अव्याहतपणे सुरू रहात आले आहे. आता हा पूल फक्त लाकडाचा असला तरी तो इतका मजबूत असतो की, केवळ पादचारीच नव्हे तर सायकलस्वार, कार, बाईक सारे काही सहजपणे पार करू शकतात. मात्र, या पूलावरून प्रवास करण्यासाठी शुल्क मात्र अदा करावे लागते. पायी चालत जाणार्‍यांना दोन 100 कंबोडियन रियाल म्हणजे 2 रुपये तर जे विदेशी नागरिक फक्त पूल पाहण्यासाठी येतात, त्यांना 4000 रियाल म्हणजे 80 रुपये द्यावे लागतात. यातून हा पूल उभा करण्याचा खर्च वसूल केला जातो.

Back to top button