

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी 'यूपीआय क्यूआर कोड' तिकीटवाटप सेवेच्या अत्याधुनिक सुरुवातीनंतर आता पुढचे पाऊल टाकत असून, मोबाईलवर तिकीट काढता यावे, यासाठी पीएमपी येत्या 20 तारखेला 'गो पीएमपी' नावाने अॅप लाँच करणार आहे. या सेवेमुळे पुणेकरांना थेट आपल्या मोबाईलवरून चित्रपटाच्या ऑनलाइन तिकिटाप्रमाणेच तिकीट काढता येणार आहे.
पीएमपीमध्ये अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली मोठे बदल होत आहेत. जुन्या कागदी तिकीट यंत्रणेला मागे टाकत पीएमपी आता ऑनलाइन तिकीट यंत्रणेपर्यंत आली आहे. तिकीट वाटपामध्ये होणारा भ्रष्टाचार कमी होऊन गाळात गेलेल्या पीएमपीला वर काढण्यासाठी सिंह यांनी विविध उपाययोजना आखल्या आहेत. त्यात त्यांनी सुरुवातीला पीएमपीची तिकीट यंत्रणा सुधारण्यावर भर दिला असल्याचे दिसत आहे.
नवीन अध्यक्ष आले की ते नव्या गाड्या खरेदी करण्यावर भर देतात. मात्र, सिंह हे यंत्रणेतील त्रुटी सुधारण्यावर भर देत असल्याचे दिसत आहेत. कारण, त्यांनी ताफ्यातील जास्तीत जास्त गाड्या मार्गावर उतरवून दीड कोटीचे दैनंदिन उत्पन्न आता दोन कोटींपर्यंत आणले आहे. त्यासोबतच आता तिकीट यंत्रणेमध्ये असलेल्या त्रुटी ते सुधारत आहे. या त्रुटी सुधारल्यामुळे इतरत्र जाणारे पैसे आता थेट पीएमपीच्या खात्यावर जमा होणार आहेत.
अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना पीएमपीच्या विविध यंत्रणा, कामकाजाच्या माहितीसह प्रवासाचे तिकीटदेखील मोबाईलवरून काढता येणार आहे. अॅपवरून तिकीट काढले तर प्रवाशांना एक क्यूआर कोड प्राप्त होणार आहे. हा क्यूआर कोड वाहकाला दाखविल्यानंतर वाहक हा क्यूआर कोड मशिनद्वारे स्कॅन करेल आणि लगेच प्रवाशांना तिकीट मिळेल, यासाठी वाहकांना जास्त वेळदेखील लागणार नाही, असा विश्वास पीएमपी अधिकार्यांनी व्यक्त केला.
पीएमपीच्या तिकीट यंत्रणेत आम्ही सुधारणा करत आहोत. नुकतीच क्यूआर कोड सेवा सुरू केली आहे. त्यानंतर आता आम्ही येत्या 20 तारखेला 'गो पीएमपी' नावाने अॅप लाँच करणार आहे. त्या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना आपल्या मोबाईलद्वारे तिकीट काढता येईल.
– सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष, पीएमपीएमएल
हेही वाचा