

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात स्थलांतर होऊन तब्बल चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीदेखील परीक्षा परिषदेच्या मूळ जागेवर कोणतीही हालचाल झालेली नाही. तसेच नवीन इमारत बांधण्याचे टेंडरदेखील काढण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेच्या नूतन इमारत भूमिपूजनाला मुहूर्तच सापडत नसल्याचे चित्र आहे. पुण्यातील डॉ. आंबेडकर रस्ता येथील लाल देवळासमोर राज्य परीक्षा परिषदेचे कार्यालय आहे.
हे कार्यालय जुने असल्यामुळे त्याठिकाणी तब्बल 111 कोटी रुपये खर्च करून नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेचे प्रशासकीय कार्यालय शिवाजीनगर येथील आगरकर रस्ता येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. राज्य मंडळातील दुसर्या आणि चौथ्या मजल्यावरून सध्या परीक्षा परिषदेचे कामकाज सुरू आहे.
परीक्षा परिषदेच्या इमारतीविषयी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा परिषदेतर्फे विभागीय परीक्षा, व्यावसायिक परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आदींचे आयोजन केले जाते. विविध परीक्षांचे आयोजन असल्यामुळे विविध आस्थापनादेखील कार्य करतात. त्यामुळे साधारण पाच मजल्यांची इमारत परीक्षा परिषद तयार करणार आहे.
त्यासाठी सल्लागार म्हणून सीओईपी संस्थेची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. नुकतीच या जागेची मोजणी करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिकेकडून आवश्यक विविध परवानग्या घेण्यात येणार आहेत. येत्या तीन महिन्यांत संबंधित कामाचे टेंडर निघणार आहे. टेंडर निघाल्यानंतर पुढील दोन वर्षांत इमारत पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये एक मोठे ऑडीटोरियम असणार आहे. त्यामुळे आता इमारतीचे भूमिपूजन नेमके कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येणार्या इमारतीमध्ये स्कूल ट्रीबुनलसाठी भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर एक संपूर्ण मजला खासगी वापरासाठी उपलब्ध केला जाणार आहे. त्यासाठी लिलावदेखील केला जाणार आहे. परंतु यामुळे परीक्षा परिषदेत चालत असलेल्या गोपनीय कामांमध्ये अडचणी येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या परीक्षा परिषदेचे कामकाज राज्य मंडळातून चांगल्या पध्दतीने सुरू आहे. पुढील दोन ते तीन वर्षे परीक्षा परिषद राज्य मंडळातूनच काम करणार आहे. नुकतीच परीक्षा परिषदेच्या मूळ जागेची मोजणी करण्यात आली असून, येत्या तीन महिन्यांत कामाचे टेंडर काढले जाईल आणि त्यानंतर इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल.
– डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा
हेही वाचा