भाजप करणार कोल्हापुरातील एका मतदारसंघावर दावा | पुढारी

भाजप करणार कोल्हापुरातील एका मतदारसंघावर दावा

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांचे सध्याचे खासदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत. मूळ शिवसेनेतून विजयी झालेले संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या दोघांनीही उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ केला आणि शिंदे गटात प्रवेश केला. राज्यात भाजप, शिवसेना-शिंदे गट व अजित पवार यांची राष्ट्रवादी असे संयुक्त महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय या तीन पक्षांतील चर्चेतच होणार आहे. कोल्हापूर किंवा हातकणंगले यापैकी एक जागा आपल्याला मिळावी, अशी भाजपची धारणा आहे. यासाठी दोन्ही मतदारसंघांत भाजप सर्व्हे करत असून, जेथे अनुकूलता असेल त्या जागेवर दावा करण्याचा भाजपचा मानस आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ परंपरेने काँग्रेसकडे होते. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसने हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले; मात्र राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीला शह देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खाते उघडले. तत्कालीन इचलकरंजी व सध्याचा हातकणंगले मतदारसंघ शेट्टी यांच्याकडे राहिला होता. त्यानंतर कोल्हापूरचे तत्कालीन खासदार राष्ट्रवादीचे सदाशिवराव मंडलिक यांचे शरद पवार यांच्याशी मतभेद  झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली व विजय मिळवला. त्यानंतर धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीचा हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणला.

राज्यातील बदलत्या राजकारणात या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेला यश मिळाले. मात्र राज्यातील सत्तानाट्यानंतर मंडलिक आणि माने यांनी शिंदे यांच्या समवेत जाणे पसंत केले. त्यानंतर एक वर्षाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ व राजेश पाटील हे दोन्ही आमदार पवार यांच्या समवेत गेले. मुश्रीफ आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राष्ट्रवादीला आता नव्याने पक्ष बांधणी करावी लागणार आहे. हे राष्ट्रवादीसाठी आव्हान आहे.

शिंदे, फडणवीस, पवार सरकारमध्ये आता लोकसभेसाठी जेंव्हा जागा वाटपाची चर्चा होईल तेंव्हा भाजप एका जागेसाठी निश्चितपणे दावा करणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून भाजप दोन्ही मतदारसंघात सर्व्हे करणार आहे. या सर्व्हेच्या आधारे जेथे आपल्याला यशाची खात्री वाटेल त्या जागेवर भाजप दावा करणार आहेत. अर्थात ही सारी चर्चेची पूर्व तयारी आहे. यातून नेमके काय निर्णय होणार हे आज सांगणे अवघड आहे. मात्र भाजपने सर्व्हेबरोबरच उमेदवारांचीही तयारी सुरू केली आहे.

धनंजय महाडिक हे भाजपचे राज्यसभेवरील खासदार आहेत. त्यांनी पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूकीच्या आखाड्यात उतरू अशी तयारी दाखवली आहे. त्याचबरोबर गोकूळच्या संचालक शौमिका महाडिक यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या फलकावर तसा स्पष्ट उल्लेख होता. एवढेच नव्हे तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गुजरी कॉर्नरला झालेल्या सभेत महाडिक यांचा नामोल्लेख करत लोकसभा की विधानसभा अशा चर्चेला फोडणी दिली.

भाजप सर्व्हे करणार आहे तर इच्छूकांनी दावेदारी सुरू केली आहे. नेते निर्णय घेतील तेंव्हाच कोणता मतदारसंघ कोणाला आणि उमेदवारही निश्चित होईल.

Back to top button