भोसरीतील उंच चेंबरमुळे अपघाताची भीती | पुढारी

भोसरीतील उंच चेंबरमुळे अपघाताची भीती

भोसरी(पुणे) : परिसरात रस्त्यांची दुरुस्ती, सिमेंट-काँक्रिटचे रस्ते, पदपथ सुशोभीकरण अशी कामे मोठ्या जोमाने सुरू आहेत. सिमेंटचे किंवा डांबरी रस्ते करताना महापालिका प्रशासन भूमिगत गटारांकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकतर गटारांची झाकणे रस्त्याच्या वर गेलेली दिसतात नाही तर खाली, यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

परिसरातील उंच व सखल चेंबरची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरकांमधून होत आहे. भोसरी परिसरात भूमिगत चेंबरची समस्या गंभीर बनली आहे. चेंबरची झाकणे रस्त्याच्या समपातळीत नसल्याने नागरिक व वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वाहनांची आदळ आपट होत असून, नागरिकांचा जीवावर उठत आहे. सिमेंटचे किंवा डांबरी रस्ते करताना चेंबरकडे लक्ष दिले जात नाही. एकतर गटारांची झाकणे वर तरी आलेली असतात नाही तर रस्त्याच्या खाली तरी असतात.

यासाठी रस्ता व चेंबरचे बांधकाम करणारे ठेकेदार आणि महापालिकेचे अभियंतेच जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अंधारात पादचारी किंवा दुचाकीस्वार अडखळून पडत असल्याचे चित्र भोसरी परिसरात पाहावयास मिळत आहे. पावसामुळे आधीच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत आता त्यात गटारांची झाकणे रस्त्याला समपातळीत नसल्याने नागरीकांची कसरत
होत आहे.

लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी

भोसरी परिसरात सिमेंट-काँक्रिटचे रस्ते, पदपथ सुशोभीकरण कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. नव्याने भूमिगत ड्रेनेज चेंबरची निर्मिती केली जात आहे. काही ठिकाणी डांबरीकरण व कॉँक्रिटकरण करताना चेंबर रस्तापातळीच्या खाली जाऊन त्याठिकाणी खड्डा तयार होऊन धोका निर्माण झाला आहे. ते टाळण्याच्या प्रयत्नात अपघात होतात. चेंबर रस्त्याला समतोल करण्यासाठी कडेने मलमपट्टी केली जाते. परंतु, ती टिकाऊ नसल्याने थोड्याच दिवसांत कडेने खड्डा तयार होत आहे. परिसरातील पादचारी मार्ग किंवा रस्त्यावर समतल नसलेले भूमिगत चेंबरची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

चेंबरची झाकणे रस्त्याच्या समपातळीत नसल्याने वाहनचालकांच्या कमरेला व पाठीला इजा होत आहे. खरे तर चेंबर रस्त्याच्या समपातळीत असणे हा आयआरसीचा एक नियम आहे. परंतु, शहरात हा नियम पाळला जात नाही. पूर्वी चेंबरची झाकणे लोखंडी असत. भंगारवाले त्यांची चोरी करत असल्यामुळे फायबरची झाकणे लावली जात आहेत. यावरून गाड्या जाऊन ती तुटतात किंवा खचतात. वेळेवर दुरुस्ती न झाल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे.

– स्थानिक नागरिक

हेही वाचा

Jalgaon Crime : जळगावात वाळू माफियांची मुजारी| तलाठ्याला धक्काबुक्की करुन वाळूचे ट्रॅक्टर पळविले

दौंडमध्ये महिला डॉक्टरने सहकारी पुरुष डॉक्टरवर भिरकावली चप्पल

Crime News : तलाठी, मंडल अधिकारी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

Back to top button