ससूनमधील दोषींवर कारवाई कधी? प्रशासनाकडून पडदा टाकण्याचे प्रयत्न | पुढारी

ससूनमधील दोषींवर कारवाई कधी? प्रशासनाकडून पडदा टाकण्याचे प्रयत्न

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर 9 पोलिसांचे निलंबन करण्यात आले. मात्र, ससून रुग्णालयात अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. डीनना प्रकरणाचे गांभीर्य समजलेले नाही की ते जाणीवपूर्वक यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये काही कैदी रुग्ण दोन महिन्यांपासून, तर काही जण नऊ महिन्यांपासून उपचार घेत होते.

ललित पाटील जूनपासून ससूनमध्ये अ‍ॅडमिट होता आणि त्याची राजरोसपणे बाहेर ये-जा सुरू होती, अशी धक्कादायक माहिती पुढे आली. ललित पाटील पळून गेल्यापासून ससून प्रशासन मूग गिळून गप्प आहे. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर कोणत्याही प्रश्नाचा स्पष्ट खुलासा करायला तयार नाहीत.

कोणता कैदी किती दिवसांपासून अ‍ॅडमिट आहे, याबाबत डॉक्टर काही सांगू शकणार नाहीत. ललित पाटीलवर सहा डॉक्टरांची टीम उपचार करीत होती, एवढेच सांगता येईल, असे डॉ. ठाकूर यांनी स्पष्ट केले. मात्र, डॉक्टरांनी आजारांचे निदान केल्याशिवाय उपचारांची दिशा ठरविता येत नाही. असे असताना कैद्यांवरील उपचारांची माहिती विभागीय आयुक्तांनी मागूनही ती देण्यास चालढकल केली जात असल्याचे दिसते. अधिष्ठाता डॉ. ठाकूर जाणीवपूर्वक गप्प आहेत की त्यांच्यावर राजकीय दबाव आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कैद्यांसाठी राजकीय व्यक्तींचे फोन

ललित पाटीलसह नामचीन गुन्हेगारांची बडदास्त ठेवण्यासाठी थेट काही मंत्र्यांकडून डीनना फोन जात असल्याचे समोर येत आहे. ललित पाटील प्रकरणात दादा भुसेंनी फोन केल्याचा थेट आरोप सुषमा अंधारे यांनी मंगळवारी केला. माजी आमदार अनिल भोसलेसाठी अधिष्ठात्यांना कोणी फोन केला होता, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

विभागीय आयुक्तांची बोळवण

ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जप्त करण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ आणि ललित पाटील पसार झाला, यानंतर ससून रुग्णालयातील कैद्यांच्या कक्षातील कैद्यांबाबतचा अहवाल मागविण्यात आला होता. याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांची ससून प्रशासनाकडून केवळ तोंडी माहितीवर बोळवण करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुण्यातील ससून रुग्णालयाची शुक्रवारी पाहणी केली. आरोग्यसेवा, मनुष्यबळ, औषधपुरवठा आदींच्या अनुषंगाने आणि ललित पाटील या कैद्याने पलायन केल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील कैद्यांच्या कक्षांचा आढावा असे एकूण दोन अहवाल देण्याचे आदेश विभागीय आयुक्त राव यांनी ससून प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार शनिवारी ससून रुग्णालयातील आरोग्यसेवा, मनुष्यबळ, औषधपुरवठा याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला, तर सोमवारी सायंकाळी कैद्यांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त राव यांना दूरध्वनीवरून तोंडी माहिती देण्यात आली आहे. ससूनमधील कैद्यांच्या कक्षात किती कैदी आहेत, कधीपासून दाखल आहेत, त्यांना कोणकोणते आजार असून, संबंधितांची पुन्हा कारागृहात कधी रवानगी केली किंवा करणार, याबाबतची माहिती विभागीय आयुक्त राव यांनी मागविली आहे. त्याकरिता ससून प्रशासनाने तीन डॉक्टरांची समिती स्थापन केली. मात्र, अहवाल विभागीय आयुक्तालयाला देण्यास टाळटाळ होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ससूनमधील दाखल कैद्यांबाबतचा लेखी अहवाल अद्याप विभागीय आयुक्तालयाला प्राप्त झालेला नाही.

हेही वाचा

टीचर्स प्रोफाईल अद्ययावत करा; अन्यथा कारवाई; पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना इशारा

Nashik News : येवला बाजार समितीत मापारी-व्यापारी वाद; लिलाव ठप्प

Israel-Hamas War : हमासकडून मधुरा नाईकची बहीण आणि तिच्या पतीची हत्या, व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केले दुःख

Back to top button