Ravindra Dhangekar : ललितसाठी शिंदे गटातील मंत्र्याचा अधिष्ठात्यांना फोन; रवींद्र धंगेकरांचा गौप्यस्फोट | पुढारी

Ravindra Dhangekar : ललितसाठी शिंदे गटातील मंत्र्याचा अधिष्ठात्यांना फोन; रवींद्र धंगेकरांचा गौप्यस्फोट

पुणे : ‘ललित पाटीलची बडदास्त ठेवण्यासाठी शिंदे गटातील एका मंत्र्याने ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना फोन केला होता,’ असा गौप्यस्फोट आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी केला. ’पैसे घेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले का?’ अशी विचारणा करत दोषी डॉक्टरांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी सकाळी ससून रुग्णालयात जाऊन कैद्यांच्या वॉर्ड क्रमांक 16 ची पाहणी केली. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची भेट घेत धंगेकर त्यांच्यावर बरसले. ’ललित पाटीलवर तुम्ही पैसे घेऊन उपचार केले की, त्याला नुसते झोपून ठेवले का? प्रकरण उघडकीस आल्यावर आठ दिवसांत इतर कैद्यांचे उपचार इतक्या वेगाने कसे झाले?

यातून तुम्ही भ—ष्टाचार करत आहात का?’ अशा प्रश्नांचा भडिमार केला. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार जाधव, उपअधीक्षक डॉ. सुजीत दिव्हारे आदी उपस्थित होते. धंगेकर म्हणाले, ’मी चाळीस वर्षांपासून ससूनमध्ये येतोय. कोणताही आजार असलातरी दोन किंवा चार दिवसांत घरी जातो. सामान्य रुग्णांना बरेचदा उपचारही मिळत नाहीत.

मग ललित पाटीलसह इतर कैद्यांवर इतके महिने नेमके काय उपचार केले, याची माहिती मिळायला हवी. ससूनच्या डीननी दोषी डॉक्टरांची चौकशी करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. शहरात अनेक ठिकाणी ड्रग माफिया आहेत आणि त्यामुळे तरुण मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. त्याला कारणीभूत असणार्‍यांवर पांघरुण घातले जात आहे.’

काय केल्या मागण्या?

ललित पाटीलवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना पाठीशी न घालता त्यांची नावे जाहीर करा. या प्रकरणाची सखोल सीआयडी चौकशी झाली पाहिजे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. मी चार-पाच दिवसांपूर्वी ललित पाटीलवर काय उपचार केले, त्याबाबत विचारणा करणारे पत्र दिले आहे. माहिती देता येत नसेल तर लिखित स्वरूपात कळवा. येत्या हिवाळी अधिवेशनात मी मुख्यमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारणार आहे.

कैदी रुग्णांबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्याबाबतची गोपनीय माहिती उघड करता येणार नाही, असे डॉ. ठाकूर यांनी सांगत माहिती देणे टाळले. सध्या एकूण किती कैदी अ‍ॅडमिट आहेत, याबाबतही खुलासा केला नाही. ललित पाटीलवर उपचार करणा-या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी मी पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे. पाटीलवर उपचार करणा-या डॉक्टरांचा परवाना रद्द करावा, असेही पत्र संबंधित संस्थेला देणार आहे.

– रवींद्र धंगेकर,
आमदार

हेही वाचा

नाशिकमधील शिंदे गटाचा विस्तार होणार, १२२ शाखाप्रमुखांची नियुक्ती करणार

japan : 72 ऋतूंचा देश जपान!

Pune Dark Night : पुण्याला झिंग डार्क नाईटची!

Back to top button