Lonavala : लोणावळा धरणात बुडून दोघांचा मृत्यू | पुढारी

Lonavala : लोणावळा धरणात बुडून दोघांचा मृत्यू

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : लोणावळा धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या तीन युवकांमधील दोघांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्व युवक लोणावळ्याजवळील ओळकाईवाडी येथील रहिवासी आहेत. मृत्यू झालेल्या दोघांपैकी एक जण कॉलेजचे शिक्षण घेत आहे. ही दुर्घटना रविवार (दि. 8) घडली.  विवेक छेत्री (21) आणि करण कुंवर (20) असे मृत झालेल्या युवकांची नावे असून, त्यांच्यासोबत असलेल्या परेश हरकसिंग भूल (18) याने यासंदर्भात लोणावळा शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विवेक, करण आणि परेश हे तिघे जण रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लोणावळा धरणाच्या मागील बाजूस फिरण्यासाठी गेले होते.

पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने विवेक आणि करण हे पाण्यात बुडू लागले. परेश याला पोहता येत असल्याने त्याने त्यातील विवेक याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा हात सुटल्याने त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. परेश याने यासंदर्भात पोलिसांना खबर दिल्यानंतर शिवदुर्ग मित्र बचाव पथकाच्या मदतीने पोलिसांनी विवेक आणि करण यांचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. चार तासांच्या शोधमोहीमेनंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

शिवदुर्गचे सदस्य अजय शेलार, महेश म्हसने, सागर कुंभार, मनोहर ढाकोल, राजेन्द्र कडु, प्रणय अंबुरे, अनिल आंद्रे, चंद्रकांत बोम्बले, अमोल परचंड, अनिकेत आंबेकर, अमोल सुतार, दक्ष काटकर, आयुष वर्तक, दुर्वेश साठे, महादेव भवर, रतन सिंह, अशोक उंबरे, सुनील गायकवाड़, ब्रिजेश ठाकुर, मयुर दळवी, साहिल भिकोले, निहाल दळवी, आकाश घरदाळे, कैलास दाभणे, दिंपाशु तिवारी यांच्या पथकाने हे सर्व शोधकार्य राबवले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा पोलिस ठाण्याचे हवालदार घोटकर हे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button