Pimpari news : नवीन शवागार सुरु; वापर मात्र जुन्याच शीतगृहाचा | पुढारी

Pimpari news : नवीन शवागार सुरु; वापर मात्र जुन्याच शीतगृहाचा

दीपेश सुराणा

पिंपरी : महापालिका पिंपरीतील  संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्था येथील नवीन शवागार सुरु करण्यात आले आहे; मात्र अद्यापही जुन्याच शवागारातील शीतगृहात मृतदेह ठेवण्यात येत आहेत. येथे 20 मृतदेह ठेवण्याची सोय आहे. नवीन शवागारातील शीतगृह सुरु होण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, रुग्णालय इमारतीशेजारी पदव्युत्तर संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नातेवाईकांसाठी रात्रनिवारा आणि पार्किंगसाठी उभारलेली इमारत बांधून पूर्ण झाली आहे. या इमारतीतील वसतिगृह पुढील आठवडाभरात सुरु करण्याचे नियोजन आहे. मात्र, इमारतीतील उर्वरित कामे पूर्ण करुन डिसेंबरपर्यंत सर्व इमारत वापरासाठी खुली करण्याचे नियोजन असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
अतिरिक्त आयुक्तांकडून कामाची पाहणी
वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्थेच्या मोकळ्या जागेतील नवीन इमारतीच्या कामाची अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी नुकतीच पाहणी केली. तसेच, येथील कामकाजाचा आढावा घेतला. या इमारतीत तीन मजल्यांवर पदव्युत्तर संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रात्रनिवारा केंद्र असणार आहे. त्याशिवाय, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय, बीएस्सी नर्सिंग महाविद्यालय, विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय आणि मेसची सोय, बहुउद्देशीय सभागृह अशा विविध सुविधा या 11 मजली इमारतीत असणार आहेत.
औषधांचे सॉफ्टवेअर अद्ययावत हवे
रुग्णालयामध्ये मध्यवर्ती औषध भांडार विभागात कोणती औषधे शिल्लक आहेत, याची नोंद संगणक यंत्रणा आणि लेखी रजिस्टर अशा दोन्ही माध्यमातून ठेवण्यात येते. येथील औषधांची माहिती संकलित करणारे सॉफ्टवेअर रुग्णालयाच्या यंत्रणेशी जोडणे गरजेचे आहे. ही यंत्रणा झाल्यास मध्यवर्ती औषध भांडार विभागात कोणती औषधे उपलब्ध आहेत, याची माहिती डॉक्टरांना संगणकावर मिळू शकेल. पर्यायाने, ते त्यानुसार रुग्णालयात उपलब्ध असलेल्या औषधांची चिठ्ठी रुग्णांना लिहून देतील. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागणार नाहीत.
नवीन शवागारातील स्थापत्यविषयक कामे पूर्ण 
वायसीएम रुग्णालयातील जुन्या शवागारात 20 मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. नव्या शवागारात ही क्षमता वाढविण्यात आली आहे. येथे 64 मृतदेह ठेवता येणार आहेत. मृतदेहांच्या शवविच्छेदनासाठी नवीन शवागारातील 8 टेबलचा सध्या वापर केला जात आहे. येथील शीतगृहातील स्थापत्यविषयक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, शीतगृहासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष व्यवस्था यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी स्पष्ट केले.
वायसीएम रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारतीच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली आहे. येथे पुढील आठवडाभरात पदव्युत्तर संस्थेतील विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु होईल. तर, इमारतीचे सर्व काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. नवीन शवागारातील शीतगृह सुरु होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल. सध्या त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे.
                                                                – प्रदीप जांभळे,  अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
वायसीएम रुग्णालयातील मध्यवर्ती औषध भांडार विभागाच्या संगणक यंत्रणेशी वायसीएमसह महापालिकेची अन्य रुग्णालये जोडणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणती औषधे भांडार विभागात उपलब्ध आहेत, याची माहिती रुग्णालयांना मिळू शकेल. तसेच, संगणकात नोंद करणे आणि लेखी साठा रजिस्टर ठेवणे अशा दोन पद्धतीने काम करावे लागत आहे. संगणक यंत्रणा अद्ययावत केल्यास कामकाज पेपरलेस होऊ शकेल.
                                                                              – राजेश निकम, फार्मासिस्ट.

Back to top button