Pune news : पालकमंत्री बदलानंतर क्रीम पोस्टिंगसाठी ‘लॉबिंग’ | पुढारी

Pune news : पालकमंत्री बदलानंतर क्रीम पोस्टिंगसाठी ‘लॉबिंग’

दिगंबर दराडे

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आल्यानंतर आता प्रशासकीय वर्तुळात ‘क्रीम’च्या पोस्टिंगसाठी अधिकार्‍यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मात्र, अजित पवारांना तत्काळ प्रश्न निकाली काढणार्‍या अधिकार्‍यांची टीम हवी आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद असताना अधिकार्‍यांची एक वेगळी टीम होती. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर अजित पवार यांचे पालकमंत्रिपद गेले. त्यांच्या पालकमंत्रिपदाबरोबर अनेक पदाधिकार्‍यांना प्रशासनातून बदलण्यात आले. कित्येक अधिकार्‍यांना अद्याप पोस्टिंगपासून वंचित ठेवले होते. बदल्या करण्यात आलेल्या अधिकार्‍यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नव्हता, तरीदेखील त्यांना पदावरून हटविण्यात आले. आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्या बदल्यात त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाबरोबर पुण्याचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिद आल्यानंतर तातडीने अनेक पदांवर अधिकार्‍यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आपली गेलेली पोस्टिंग मिळविण्यासाठी अधिकारी सक्रिय झाले आहेत. काही झाले तरी ‘मी पुन्हा येईन’ असाच नारा अधिकारी देत असल्याचे समोर आले आहे. क्रिम पोस्टिंगवर अनेक अधिकारी येऊन बसले आहेत. त्यांना कशाप्रकारे हटविले जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांना मात्र काम करणार्‍या सक्षम अधिकार्‍यांची टीम हवी आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्यांसाठी हालचाली सुरू आहेत. ‘मी पुन्हा येईन’चा नारा अधिकारी देत आहेत. मात्र, तीन जणांचे सरकार असल्याने अडचणीही समोर आलेल्या आहेत. अनेक अधिकार्‍यांचे अधिकारदेखील काढून घेण्यात आलेले आहेत. ते अधिकार आता अजित पवारांच्या काळात परत मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रिंगरोड अजित पवारांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’
रस्ते विकास महामंडळाचा पुण्याचा रिंगरोड अजित पवारांनी ड्रीम प्रोजेक्ट बनविला आहे. अजित पवार यांनी सक्षम अधिकार्‍यांच्या मदतीने हा प्रकल्प पुढे सरकवला आहे. प्रामुख्याने याकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुण्याच्या रिंगरोडला तातडीने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही तातडीने कामे मार्गी लावा, मी तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो, अशा सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिलेल्या आहेत.

तिघांच्या सरकारमुळे अधिकार्‍यांची कोंडी
राज्य सरकारमध्ये तीन पक्ष सहभागी असल्याने अधिकार्‍यांना पोस्टिंग करणे अवघड जात आहे. नेमके कोणाचे ऐकायचे? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अनेक अधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून असले, तरी त्यांना पोस्टिंग मिळेल का नाही? याबाबत साशंकता असल्याचे बोलले जात आहे. महसूलमंत्री बदलल्यानंतर पुण्यातील महसूल विभागाचीदेखील कूस बदलल्याचे सर्वांनी पाहिले आहे. हीच कूस आता अजित पवार बदलणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Back to top button