भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे जन्माला आले ब्राझिलीयन गिर जातीचे वासरू

भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे जन्माला आले ब्राझिलीयन गिर जातीचे वासरू

पुणे : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागातंर्गत नागपूर येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडून ताथवडे येथे बाह्यफलन व भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा संचलित केली जाते. या प्रयोगशाळेत भ्रूण प्रत्यारोपणाच्या साहाय्याने ब्राझिलीयन वंशावळ असलेल्या गिर जातीच्या मादी वासराचा जन्म झाल्याची माहिती महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी दिली.
या प्रयोगशाळेत एप्रिल 2021 पासून पंढरपुरी म्हैस व फ्रिजवाल, जर्सी, गिर, सहिवाल गाईंमध्ये बाह्य भ्रूण निर्मिती व भ्रूण प्रत्यारोपणाचे काम डॉ. व्ही. बी. जवणे, डॉ. बी.पी. सांगळे या डॉक्टरांच्या समूहाद्वारे केले जात आहे. या प्रयोगातून यशस्वरीत्या वासरू जन्माला आले आहे. आतापर्यंत संकरित गायी, सहिवाल, जर्सी, गिर व पंढरपुरी म्हैस जातीचे मिळून एकूण 14 वासरे जन्माला आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांनी कळविली आहे.

ताथवडे येथील भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा वळु माता प्रक्षेत्रावर या गिर वंशावळीच्या वासराचा जन्म झाला असल्याचे वळु माता प्रक्षेत्राचे व्यवस्थापक डॉ. हरिश्चंद्र अभ्यंकर यांनी सांगितले.

ब्राझिलीयन वंशावळ असलेल्या गिर जातीच्या गाईचे एका वेतातील दूध 12 हजार ते 16 हजार 500 किलोएवढे आहे. भारतातील गिर गाय दिवसाला 10 ते 12 लिटर इतके दूध देते. मात्र, आता 40 ते 50 लिटर प्रतिदिन दूध देणार्‍या गिर गाईची वंशावळ तयार करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. या तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचणीमुळे गिर जातीमध्ये अनुवंशिक सुधारणा करण्याच्या हेतूने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
   – डॉ. विष्णू जवण, प्रमुख, भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा,वळू माता प्रक्षेत्र, ताथवडे, पुणे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news