

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससूनमधून ड्रग्ज रॅकेट चालविणारा तस्कर ललित आणि त्याचा भाऊ भूषण पाटील आंतरराष्ट्रीय बाजारात शेळ्या-मेंढ्यांची विक्री करतात की ड्रग्ज तस्करी, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. कारण, भूषण पाटीलची कंपनी दुबई व यूएईमध्ये शेळ्यांची निर्यांत करीत असल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून पाटील बंधूंनी विदेशात ड्रग्ज तस्करी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. ड्रग रॅकेट चालविणारा तस्कर ललित पाटील ससूनमधून पळून गेला आणि ड्रग्ज प्रकरण चर्चेत आले. ललीतच्या शोधात पोलिस जंगजंग पछाडत असताना मुंबईच्या साकीनाका पोलिसांना ललितचा भाऊ भूषण चालवत असलेल्या नाशिकमधील ड्रग्जच्या कारखान्याचा शोध लागला. यापूर्वीही 2020 मध्ये पोलिसांनी पाटील बंधूंचा चाकण येथील ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केला होता.
संबंधित बातम्या :
भूषण पाटील हा अॅग्रो अँड अॅनिमल कॉर्पोरेशन नावाची कंपनी नाशिक शहरातील म्हसोबा मंदिर उपनगर येथून चालवत होता, अशी माहितीही उजेडात आली आहे. ड्रग तस्करी करताना विविध क्लृप्त्या ड्रग तस्कर वापरत असतात. यामध्ये विदेशातून अमली पदार्थ तस्करी करण्यासाठी त्याची चोरट्या मार्गाने तस्करी केली जाते. या ड्रगची तस्करी शेळ्यांच्या माध्यमातून विदेशात झाली का? त्याचे शेळ्यांचे व्यवहार नेमके कोणाशी होत होते? हेदेखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
ललित, भूषण अदृश्य झाले का?
ससूनचे रॅकेट उद्ध्वस्त करून आठ दिवसांचा कालावधी उलटला असताना मागील सात दिवसांपासून पुणे पोलिस, मुंबई पोलिस, नाशिक पोलिस तसेच अमली पदार्थ तस्करविरोधी पथके राज्यातील विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेत आहेत. यामध्ये नाशिक येथील ड्रग्ज कारखाना शोधून काढला असला, तरी मुख्य आरोपी भूषण व ललित पाटीलचा शोध पोलिसांना लागू शकलेला नाही. दोघांशी संबंधित व्यवहारात गुंतलेले आता तपास पथकांच्या व तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे. यानिमित्त राज्यातील ड्रग्ज तस्करी करणार्यांचे धाबेदेखील दणाणले आहेत.