Pune News : जेजुरी, बारामतीच्या गवताळ प्रदेशांचे पुनरुज्जीवन | पुढारी

Pune News : जेजुरी, बारामतीच्या गवताळ प्रदेशांचे पुनरुज्जीवन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शाकाहारी प्राण्यांचे खाद्य म्हणजे गवत. परंतु, गेल्या काही वर्षांत पौष्टीक, रुचकर गवतच मिळत नसल्याने या प्राण्यांचे जीवनच धोक्यात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सासवड, मोरगाव, जेजुरी आणि बारामती या गावांत पुणे शहरातील ग्रासलॅन्ड संस्था व वन विभागाच्या वतीने पौष्टीक गवत लागवडीसाठी पथदर्शी प्रकल्प लवकरच राबविला जाणार आहे.
पथदर्शी प्रकल्पासाठी  चार गावांची निवड
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर गावात बंगळूरू येथील एटीआरईई (अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी) या संस्थेच्या  सहकार्याने असा प्रकल्प सुरू आहे. सध्याच्या प्रदेशाचे मुल्यांकन करण्यासाठी पर्यावरणीय सर्वेक्षणांसह  पुण्यातील स्थानिक महाविद्यालयात रोपवाटिका स्थापन केल्या जात आहेत. त्याच धर्तीवर आता सासवड, मोरगाव, जेरुरी आणि बारामती येथे हा प्रकल्प राबविला जाणार आहे. हे काम वन विभाग आणि ग्रासलॅन्ड या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यावर त्यांचे काम सुरु झाले असून चार गावांची निवड पथदर्शी प्रकल्पासाठी करण्यात आली आहे.
रुचकर, पौष्टीक  गवत होतेय नामशेष…
 मूळ गवतांच्या प्रजातीवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अति चराई, अवैज्ञानिक वृक्षारोपण आणि विकासात्मक दबाव यामुळे गवताळ भाग मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहेे. पौष्टिक, रुचकर गवताच्या प्रजाती तसेच पोषण नसलेल्या गवतांनी इतर गवतांचा ताबा घेतला आहे.त्यामुळे गवताळ प्रदेशातील शाकाहारी प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
देशात18 दशलक्ष हेक्टरने क्षेत्र घटले..
देशात गवताळ क्षेत्र 18 दशलक्ष हेक्टरने घटले आहे. यात राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशात गवताळ प्रदेशांचा ह्रास 60 टक्के झाला आहे. महाराष्ट्रात 23 हजार 245 चौ.कि.मी.क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल केंद्र शासनाने नुकताच प्रसिध्द केला आहे.
हा प्रकल्प ग्रासलॅन्ड संस्था आणि वनविभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविला जाणार आहे. महिनाभरात तो सुरु होईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी काही निधी शासनाकडून तर काही कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून मिळण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
                                                                        -मिहीर गोडबोले, अध्यक्ष ग्रासलॅन्ड संस्था,पुणे
हेही वाचा : 

Back to top button