

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एकाला दोघांनी 5 लाख 68 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी, विशाल शामलाल ओझा (वय 41,आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी पांडुरंग गाढवेकर आणि निशीगंधा नितीन पाटील या दोघांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मे 2023 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.
ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आरोपींनी फिर्यादीना आमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडून गुंतवणुकीसाठी 18 लाख 12 हजार 750 रुपये घेतले. त्यावर नफा स्वरूपात मिळालेली रक्कम 12 लाख 3 हजार 994 रुपये वजा केली असता, राहिलेले 5 लाख 68 हजार 756 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नर्हे रोड येथील मझहर पटेल (वय 40) यांनादेखील एका व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला देण्याच्या बहाण्याने 19 लाख 25 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी मझहर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने व्हॉटस्अपद्वारे मझहर यांच्यासोबत संपर्क केला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून क्रिसेट पार्टर्न्स शेअर मार्केट कंपनीच्या नावे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखलवे. फिर्यादी आरोपीच्या जाळ्यात अडकले. त्यांनी वेळोवेळी आरोपीच्या बँक खात्यावर 19 लाख 25 हजार रुपये भरले. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन तपास करीत आहेत.
हेही वाचा