पुणे : राज्यात 2011 च्या जनगणनेनुसार 1 कोटी 63 लाख 3 हजार 772 निरक्षर आहेत. त्यातील 12 लाख 40 हजार निरक्षरांना साक्षर करण्यासाठी नुकत्याच झालेल्या साक्षरता दिनापासून सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, या साक्षरता अभियानासाठी राज्यात केवळ 16 हजार 471 निरक्षरांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षकांना निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, त्यांनी बहिष्कार घातल्यामुळे नवभारत साक्षरता अभियान कागदावरच राहण्याची भीती निर्माण झाली आहे. नवतंत्रज्ञानाच्या जमान्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे प्रयोग होत आहेत. देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू असून, सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताची जगभरात ओळख आहे. तरीही देशात पाच कोटींहून अधिक लोक निरक्षर असून, त्यात महाराष्ट्रातील दीड कोटीहून अधिक लोकांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
त्या लोकांना काहीही करून 2027 पर्यंत साक्षर केले जाणार आहे. त्यासाठी 'नवभारत साक्षरता' अभियानांतर्गत यंदा 12 लाख 40 हजार लोकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्यासाठी प्रत्येक 10 व्यक्तींसाठी एक स्वयंसेवक नेमला जाणार आहे. अंगणवाडी सेविकांपासून महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, नेहरू युवा केंद्रातील तरुणांना (किमान आठवी उत्तीर्ण) स्वयंसेवक म्हणून काम करता येणार आहे.
यासंदर्भात अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांनी सर्वेक्षणावर घातलेल्या बहिष्कारामुळे निरक्षरांचे सर्वेक्षण झाले नाही. परिणामी गेल्या वर्षीचे 6 लाख 20 हजार आणि यंदाचे 6 लाख 20 हजार, अशा एकूण 12 लाख 40 हजार निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट असतानाही प्रत्यक्षात केवळ 16 हजार 471 निरक्षरांची नोंद झालेली आहे. तर, त्यांना शिकवण्यासाठी 1 लाख 24 हजार स्वयंसेवकांची नोंद होणे अपेक्षित असताना 2 हजार 530 स्वयंसेवकांचीच नोंद झाली आहे. सामाजिक हिताचा विचार करून शिक्षकांनी निरक्षरांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यामुळे महाराष्ट्रात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. अन्य राज्यांमध्ये निरक्षरांचे अध्यापन होऊन त्यांची परीक्षा घेतली गेली.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष
गाव, तालुका, जिल्हापातळीवर काम करणार्या प्रशासनाने निरक्षरांना शोधून त्यांना साक्षरतेचे धडे देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांचे 'नवभारत साक्षरता' अभियानाकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे. निरक्षरांना शोधण्यातच अपयश आल्यामुळे त्यांना साक्षर कसे करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात केवळ 16 हजार 471 निरक्षरांची नोंद
शिक्षकांच्या बहिष्कारामुळे
'नवभारत साक्षरता' अभियानाला खोडा
12 लाख 40 हजार निरीक्षरांना
साक्षर करण्याचे उद्दिष्ट फोल ठरणार
शिक्षकांचा सर्वेक्षणास नकार
शालाबाह्य काम म्हणून निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यास शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे राज्यात नेमके निरक्षर कोण आहेत? हेच सिध्द होऊ शकले नाही. केवळ उद्दिष्ट ठरवून चालणार नाही, तर राज्यातील निरक्षरांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सध्याची आकडेवारी 2011 च्या जणगणनेमधील आहे. त्यामुळे सर्वेक्षण झाल्याशिवाय निरक्षरांची नेमकी संख्या बाहेर येणे शक्य नाही. त्यासाठीच योजना संचालनालयाने शिक्षकांना सर्वेक्षणावरील बहिष्कार मागे घेण्याचे आवाहनदेखील केले होते. परंतु, याला शिक्षक संघटनांनी केराची टोपली दाखविल्यामुळे सर्वेक्षणच झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.