Milk Rate : दुधाच्या दरात खासगीवाल्यांचा ‘मिठाचा खडा’ | पुढारी

Milk Rate : दुधाच्या दरात खासगीवाल्यांचा ‘मिठाचा खडा’

समीर भुजबळ

वाल्हे : जुलै महिन्यात शासनाने गाईच्या दुधास 34 रुपये दर निश्चित केला होता. मात्र, दोन महिन्यांतच खासगी दूध प्रकल्पांनी पुन्हा 2 रुपये दर कमी करून दर 32 रुपयांवर आणल्याने ऐन सणासुदीच्या काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. चारा-पाणी टंचाईने त्रस्त शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची संतप्त प्रतिक्रिया, दूध उत्पादकांमधून येत आहे. यावर्षी पुरंदर तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक भागांत ऐन पावसाळ्यात टँकर सुरू आहेत. जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने अनेक पशुपालक दुसर्‍या तालुक्यातून चारा आणून पशुधन वाचविण्यासाठी धडपडत आहेत. या कठीण परिस्थितीत शेतकर्‍यांना साथ द्यायची सोडून दुधाचे वाढलेले दर व दुधाला चांगली मागणी असतानाही खासगी दूध संघाने खरेदी दरात 2 रुपये घट केल्याने थेट शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे.

मागील काही महिन्यांपासून ’लंपी’ या जनावरांच्या संसर्गजन्य आजारामुळे, पशुखाद्याचे दर वाढल्याने पशुपालक आधीच अडचणीत आहेत. दसरा-दिवाळी सणांमध्ये दुधाची मागणी जास्त वाढते. हिरव्या चाराटंचाईमुळे दुधाच्या उत्पादनात घट होते. अशा वेळी दूधाचे दर चढे असतात. मात्र, खासगी दूध संघांनी मागणीच्या काळात दर कमी केल्याचे गणित काही उमगत नाही.

हेही वाचा : 

Back to top button