ई-वाहनांना पुणेकरांची पसंती ; सध्या पुण्यात 59 हजार इलेक्ट्रिक वाहने | पुढारी

ई-वाहनांना पुणेकरांची पसंती ; सध्या पुण्यात 59 हजार इलेक्ट्रिक वाहने

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्या पुणे शहरातील इलेक्ट्रिक वाहनांना पुणेकरांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असून, इतर वाहनांप्रमाणेच पुणेकर इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात पुढाकार घेत आहेत. सध्या पुणे शहरात 59 हजारांच्या घरात इलेक्ट्रिक वाहने असून, यात पुणेकरांनी दुचाकी, चारचाकींना पसंती दिल्याचे दिसते.

संबंधित बातम्या :

बदलत्या काळानुसार अनेक गोष्टींमध्ये बदल होतात आणि पुणेकर नागरिकही ते बदल स्वीकारतात. इंधनावरील वाहने, नंतर सीएनजी वाहने आणि आता इलेक्ट्रिक वाहनांचे युग सुरू आहे. त्यासोबतच सध्या केंद्र शासनाकडून पर्यावरणपूरक वाहनांचा मोठ्या प्रमाणावर पुरस्कार करण्यात येत आहे. त्यामुळे सीएनजी, इंधनावरील वाहनांसोबतच आता पुणेकर नागरिक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यावर भर देत आहेत. तसेच, स्पोर्ट्स बाईक्स, मोपेड आणि आलिशान कारसुद्धा इलेक्ट्रिक स्वरूपात मिळत आहेत. त्यामुळे वाहनचालक या गाड्या घेण्यावर भर देत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या

दुचाकी – 52 हजार 455 (नॉन-ट्रान्सपोर्ट)

चारचाकी – 4 हजार 169 (नॉन-ट्रान्सपोर्ट)

बस – 592 (ट्रान्सपोर्ट)

ई-रिक्षा – 75 (पॅसेंजर -ट्रान्सपोर्ट)

ई-रिक्षा – 422 (कार्ट गुड‌्स – ट्रान्सपोर्ट)

गुड‌्स कार – 59

मोटार कॅब टॅक्सी – 644

तीनचाकी – 571 (गुड्स)

तीनचाकी – 50 (ट्रान्सपोर्ट)

नॉन-ट्रान्सपोर्ट एकूण – 56, 628

ट्रान्सपोर्ट एकूण – 2413

– एकूण – 59 हजार 37 ई-वाहने

इलेक्ट्रिक ट्रक पुण्यात नाही
पुणेकरांनी दुचाकी, चारचाकी कार, बस, रिक्षा यांसारखी इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहेत. यात प्रथम क्रमांकावर दुचाकींची संख्या आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर चारचाकी आहेत. ई-बससह ई-रिक्षांचीदेखील पुणे शहरात चांगल्याप्रकारे खरेदी होत आहे. मात्र, इलेक्ट्रिक ट्रकची अद्याप पुणे आरटीओत नोंद नाही.

ई वाहने खरेदी करण्याकडे पुणेकरांचा वाढता कल आहे. यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असल्याची नोंद कार्यालयात करण्यात आलेली आहे.

                                 – संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

Back to top button