Pune News : जुन्नरला ग्रा. पं. निवडणुकांमुळे राजकारण तापणार

Pune News : जुन्नरला ग्रा. पं. निवडणुकांमुळे राजकारण तापणार

ओझर : जुन्नर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, निवडणुकीदरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे व भाजप नेत्या आशाताई बुचके या निवडणुकांवर लक्ष ठेवून राहणार आहेत. आपल्या विचाराच्या जास्तीत जास्त ग्रामपंचायती याव्यात, यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत.

जुन्नर तालुक्यात एकूण 26 गावांच्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यकम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येत्या 16 तारखेपासून सुरुवात होणार आहे, तर प्रत्यक्षात 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. साधारण एक महिनाभर राजकीय वातावरण तापणार असून, निवडणूक असलेल्या गावांत चांगलाच कलगी-तुरा पाहायला मिळणार आहे. सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने राजकीय गट निवडणुका प्रतिष्ठा पणाला लावून लढणार आहेत. ही निवडणूक प्रत्यक्षात पक्षचिन्हावर लढविली जाणार नसली, तरी प्रत्येक राजकीय पक्ष आपलीच सत्ता यावी म्हणून प्रयत्न करू शकतो.

मोठ्या गावच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. यात नारायणगाव, पिंपळवंडी, वडगाव आनंद, कांदळी, बेल्हे, उंब—ज नं. 1 या गावांचा समावेश आहे. पिंपळवंडी हे गाव माजी आमदार शरद सोनवणे यांचे आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे हे याच गावचे. त्यामुळे पिंपळवंडी गावची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. नारायणगाव हे जुन्नर तालुक्यातील मोठे गाव. या गावचीदेखील निवडणूक चांगली रंगू शकते. खा. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके नारायणगावात राहतात. त्यामुळे या गावची निवडणूक जिल्ह्यात चर्चेची ठरू शकते. या गावची सत्ता आपल्याकडे यावी म्हणून सगळेच प्रयत्न करणार आहेत. भाजप व उद्धव ठाकरे (शिवसेना) यांची युती होऊ शकते, तर इतर सगळे एकत्र येऊन वेगळे पॅनेल उभे करू शकतात.

बेल्हे गावची पहिलीच ही निवडणूक स्व. राजाभाऊ गुंजाळ यांच्या अपरोक्ष होत आहे. ते हयात असताना मागची निवडणूक चांगलीच गाजली होती. त्यांनी विरोधकांची डाळ शिजू दिली नव्हती. आता ते हयात नसल्याने इतर नेत्यांना सत्तेचे डोहाळे लागू शकतात. मागच्या निवडणुकीत एकत्र काम केलेले अशोक घोडके व प्रदीप पिंगट या निवडणुकीत मप्रदीप पिंगट गट व अशोक घोडके गटफ अशी निवडणूक लढू शकतात. निवडणुकीत बेल्हे-जेजुरी रस्त्याचा विषय गाजू शकतो. बेल्हे गावातून जाणारा हा रस्ता वादाचा ठरला होता. 'माझ्यामुळेच रस्त्याचे काम मार्गी लागले,' अशी स्पर्धा पाहायला मिळाली व अमक्यामुळे रस्त्याचे काम रखडले, अशी टीका होत होती. आता हा मुद्दा कळीचा ठरू शकतो.

वडगाव आनंदची निवडणूक गाजणार
या वेळी वडगाव आनंद गावातील निवडणूक गाजू शकते. सोसायटी निवडणूक एकतर्फी जिंकणार्‍या मंडळींना गावची सत्ता आपल्याकडे घ्यायची म्हणून ते प्रयत्न करू शकतात. तसेच काही महिलाही या निवडणुकीत पुढे येण्याची शक्यता आहे. सचिन वाळुंज यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news