Pune crime news : पूर्ववैमनस्यातून खून; आंदेकर टोळीप्रमुखासह साथीदार जेरबंद | पुढारी

Pune crime news : पूर्ववैमनस्यातून खून; आंदेकर टोळीप्रमुखासह साथीदार जेरबंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वर्चस्वाच्या वादातून आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी दोघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना नाना पेठ परिसरात घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आंदेकर टोळीच्या प्रमुखासह सहा जणांना अटक केली आहे, तर तिघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (67, रा. नाना पेठ), कृष्णराज उर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर (33), तुषार निलंजय वाडेकर (24), स्वराज निलंजय वाडेकर (20), पुराराम दियाराम गुजर, आकाश रामदास खरात, आमीर खान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या तिघा अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेत निखिल आखाडे (वय 29) याचा मृत्यू झाला आहे. तर, अनिकेत दुधभाते (वय 27, दोघे रा. आंबेगाव पठार, धनकवडी) हा जखमी आहे. सोमवारी (दि. 2) ही घटना घडली होती.

संबंधित बातम्या : 

नाना पेठेतील आंदेकर टोळी आणि ठोंबरे टोळीत वैमनस्य आहे. ठोंबरेचा साथीदार सोमनाथ गायकवाड याचे निखिल आखाडे व अनिकेत दुधभाते मित्र आहेत. सोमवारी सायंकाळी आखाडे आणि दुधभाते गणेश पेठेतील शितळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे निघाले होते. त्या वेळी आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत आखाडे आणि दुधभाते गंभीर जखमी झाले. तर, उपचारादरम्यान आखाडे याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सौरभ माने यांच्यासह पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पसार झालेल्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.

Back to top button