शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे व नागरिकांना चावा घेण्याच्या प्रकारामुळे शहरात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण शहरात हजारांच्या पुढे एवढी कुत्री असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दि. 3 ऑक्टोबर रोजी गुजरमळा येथील आयुष भास्कर हरिहर या चार वर्षांच्या परिसरातील काही भटक्या कुत्र्यांनी खाली पाडून चावा घेतला व डोक्याला पकडून त्याच्यावर हल्ला केला. मात्र, नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत त्या कुत्र्यांपासून आयुषची सुटका केली. या घटनेची माहिती शहरात मिळताच गेल्या अनेक वर्षांपासूनचा या गंभीर प्रश्नावर नगरपरिषदेने का लक्ष दिले नाही? असा प्रश्न पुढे आला आहे.
संबंधित बातमी :
रात्री कंपनीतून घरी येणारे कामगार, पहाटे फिरायला, व्यायामाला जाणार्या नागरिकांवर ही कुत्री धावतात व चावा घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक दुचाकीस्वारांना या कुत्र्यांना चुकविताना अपघात झाला आहे. हा प्रश्न गंभीर असल्याने शिरूर शहर मनसेच्या वतीने मुख्याधिकारी स्मिता काळे यांची भेट घेऊन लवकर कारवाई करून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी केल्याचे मनसे उपजिल्हाप्रमुख महिबूब सय्यद यांनी सांगितले. दरम्यान, मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी सांगितले की, कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मुलाच्या घरी भेट दिली असून, त्याची तब्येत व्यवस्थित आहे. या घटनेसंदर्भात नगरपरिषद संवेदनशील आहे. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही करणार आहे. सरकारी रुग्णालयात लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे.