नानगाव : पुढारी वृत्तसेवा : पारगाव सा. मा. (ता. दौंंड) येथील इको बँकेत बसलेल्या एका महिलेच्या हातामधून जवळपास साडेबारा हजार रुपये चोरट्याने पळवले. चोरी करून चोरटा दुचाकीवरून पसार झाला. या वेळी काही युवकांनी त्याचा पाठलाग केला. जवळपास 10 किलोमीटर अंतरावर गेल्यावर हा चोरटा एका दुचाकीला धडकला आणि पकडला गेला. पारगाव सा. मा. येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून एका व्यक्तीने काही रक्कम काढून आणली व नंतर तो शेजारच्या इको बँकेत पैशांच्या व्यवहारासाठी आला. त्या वेळी त्याने ही रक्कम त्याच्याबरोबर असलेल्या महिलेजवळ दिली. या वेळी मास्क घातलेला चोरटादेखील बँकेत होता.
संबंधित बातम्या :
ही महिला खुर्चीवर बसलेली व हातात पैसे असलेले पाहून चोरटा तिच्याजवळ येऊन बसला. त्यानंतर महिलेकडील पैसे जुळवून ते मोजण्याच्या बहाणा करत त्यातील साडेबारा हजार रुपये काढून तो बँकेच्या बाहेर पडला. तेवढ्यात बँकेतून महिलेला पैसे चोरल्याचे समजले. तिने आरडाओरडा केला. तोपर्यंत चोरटा दुचाकीवरून पसार झाला. या वेळी काही युवकांनी त्याचा पाठलाग केला.
चोरटा केडगावच्या दिशेने निघाला. युवक पाठलाग करत असल्याचे समजताच त्याने दापोडी चौकातून खुटबावच्या दिशेने दुचाकी भरधाव नेली. याच भागात चोरटा दुसर्या एका दुचाकीस्वाराला धडकला आणि युवकांच्या हाती लागला. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.