Pune News : जैवविविधता उद्यान वाचविण्यासाठी आराखडा करा : खा. वंदना चव्हाण | पुढारी

Pune News : जैवविविधता उद्यान वाचविण्यासाठी आराखडा करा : खा. वंदना चव्हाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जैवविविधता उद्यान (बीडीपी) आरक्षण असलेल्या टेकड्या फोडल्या जात आहेत. त्यावर अतिक्रमणे होत आहेत. त्या तुम्हाला वाचवायच्या आहेत की नाही? असा प्रश्न उपस्थित करीत खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी बीडीपी जागा वाचविण्यासाठी त्याचा विकास आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात खासदार चव्हाण यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे. शहराच्या विकास आराखड्यात आसपासच्या अनेक टेकड्यांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. मात्र, टेकड्या फोडल्या जात आहेत. त्यावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. याबाबत महापालिकेचे अनेकवेळा लक्ष वेधले आहे. परंतु, त्यावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही.

संबंधित बातम्या :

आरक्षण टाकलेल्या काही जागा या खासगी मालकीच्या आहेत. त्यांना आरक्षणाच्या बदल्यात मोबदला लवकर दिला पाहिजे. त्याचाही निर्णय त्वरित घेणे आवश्यक आहे. बीडीपीचे आरक्षण असलेल्या क्षेत्रावर संरक्षक कुंपण उभे करावे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी. बीडीपी क्षेत्राच्या विकासाकरिता स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. या जागांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी सातबारा उतार्‍यावर बीडीपी आरक्षणाची नोंद करावी. खासगी आणि सरकारी जागा, असे वर्गीकरण करावे, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

“शहराची झपाट्याने होत असलेली वाढ, भरघोस एफएसआयच्या वाटपाचा निर्णय ज्याला आमचा विरोधही आहे. हवामान बदलाचे गंभीर परिणाम, ढगफुटी, पूर येणे, उष्णतेच्या लाटा, हवेची खालावत जाणारी गुणवत्ता, रोगराई, भूगर्भातील पाणी कमी होणे, अशा गोष्टी लक्षात घेता शहराच्या हिरव्या फुप्फुसांचे संरक्षण करणे अत्यंत अत्यावश्यक आहे.”

                                                                अ‍ॅड. वंदना चव्हाण, खासदार

Back to top button