पुणे : पुढारी वृत्तसेवा : आर्थिक घोटाळा प्रकरणातील कैद्याचा रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यासाठी थेट राज्यातील राजकीय वरिष्ठांकडूनच ससून प्रशासनावर दबाव आणला जात आहे. डिस्चार्ज कार्डवर सही करणाऱ्या डॉक्टरांना घरचा रस्ता दाखविण्याची धमकीही दिली जात असल्याची धक्कादायक माहिती ससूनमधील एका डॉक्टरने दिली. ससून रुग्णालयातून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील पळून गेल्यानंतर सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कैद्यांची तातडीने तपासणी, उपचार करून त्यांना वेळेत डिस्चार्ज का दिला जात नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताने कैदी तळ ठोकून बसत असल्याचे निदर्शनास आले आहे.
संबंधित बातम्या :
ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये कैद्यांना अॅडमिट केले जाते. वाॅर्डमध्ये रुग्णालयातील एक सफाई कामगार आणि एक नर्स एवढाच स्टाफ असतो. वाॅर्डमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कैद्यांची जबाबदारी असते. कैद्यांना तपासणीसाठी घेऊन जाताना त्यांच्या सोबतीला पोलिस गार्ड दिले जातात. कोणतीही मोठी तपासणी अथवा शस्त्रक्रिया करायची असल्यास कोर्टाची ऑर्डर आवश्यक असते. याबाबत विचारणा केल्यास बरेचदा पोलिसांकडून डॉक्टरांवर अरेरावी केली जात असल्याचे चित्र समोर येत आहे.