PMC Election : महापालिका निवडणुकांसाठी ‘तारीख पे तारीख’ | पुढारी

PMC Election : महापालिका निवडणुकांसाठी 'तारीख पे तारीख'

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकांसदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी पुन्हा दि. 28 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे या वर्षात आता या निवडणुका होण्याची शक्यता जवळपास मावळली असून, आता थेट लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतरच सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवडसह जवळपास 23 महापालिकांचा कार्यकाळ संपला आहे. या दोन्ही महापालिकांमध्ये जवळपास दीड वर्षापासून; तर कोल्हापूर, नवी मुंबईसह काही महापालिकांमध्ये तब्बल पाच वर्षांपासून प्रशासकराज आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये या निवडणुकीसाठी मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी तीनसदस्यीय प्रभागरचना केली होती. मात्र, शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर 2017 प्रमाणे निवडणुकांचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात परस्परविरोधी याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर गेल्या वर्षभरापासून सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलली जात आहे. बुधवारी असलेली सुनावणी आता पुन्हा 28 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे या वर्षात निवडणुका होण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही निवडणुका झाल्यानंतरच महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुका होतील, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

हेही वाचा

Sassoon hospital News : ससूनमधून दोन आरोपींना डिस्चार्ज

Ajit Pawar : सुप्त संघर्षात अजित पवारांची सरशी

Back to top button