आकुर्डी गुरुद्वारा चौकात मोठंमोठे खड्डे; रोज होताहेत अपघात | पुढारी

आकुर्डी गुरुद्वारा चौकात मोठंमोठे खड्डे; रोज होताहेत अपघात

आकुर्डी(पुणे) : गंगानगरकडून आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या छोट्या ब्रीजजवळ तसेच गुरुद्वारा चौकात जाणार्‍या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. मागील आठवड्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाने रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले असून, अपघातास निमंत्रण मिळत आहे.

पायी चालणेही झाले अवघड

गुरुद्वारा साईड आकुर्डी रेल्वे स्टेशनरोड परिसरात व पदपथावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे प्रवाशांना पायी चालणेही अवघड झाले आहे. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहने चालविणार्‍यांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुद्वारा ते वाल्हेकरवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे दुचाकी किंवा चारचाकी गेल्यास प्रवाशांच्या अंगावर घाण पाणी उडत आहे. त्यामुळे भांडणाचे प्रकारही घडत आहेत. दररोज या रस्त्यावरून प्रवास करणार्‍या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खड्डा पडलेल्या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

छोट्या रेल्वे ब्रीजखालीही कायमस्वरूपी असते पाणी

रेल्वेच्या छोट्या ब्रीजखालीही खड्डे पडले असून, पुलाखाली अंधार असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचत असल्याने चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. स्टेशन परिसरातील रस्त्यांची पावसामुळे चाळण झाली आहे. त्यामुळे चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच, आकुर्डी-गंगानगर रस्त्यावर खड्डे पडून खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे वाहने चालविताना घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. स्थापत्य विभागाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवाशी आणि वाहनचालकांनी केली आहे.
आकुडी गुरुद्वारा परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची माहिती घेऊन लगेचच ती बुजविण्याची व्यवस्था करण्यात येईल.
-प्रमोद ओंबासे, स्थापत्य विभागप्रमुख

Back to top button