प्रभाकर बांगर यांच्या हल्लेखोरांना अटक करा : देवदत्त निकम | पुढारी

प्रभाकर बांगर यांच्या हल्लेखोरांना अटक करा : देवदत्त निकम

मंचर : पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर हे शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी नेहमी आंदोलन करीत असतात. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रकार निंदनीय असून, हल्ला करणार्‍यांना तातडीने अटक करा, अशी मागणी भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी पोलिसांकडे मंगळवारी (दि. 3) केली आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर सोमवारी (दि. 2) एकलहरे (ता. आंबेगाव) येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, किसान सभा, आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गणेश खानदेशे, वैभव टेमकर, माऊली ढोमे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

देवदत्त निकम म्हणाले की, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी कर्तव्यामध्ये कसूर न करता आरोपींना चार ते पाच तासांत अटक करावी. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश तात्या बालवडकर यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका करीत प्रभाकर बांगर यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर हल्ला करणार्‍या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. प्रभाकर बांगर यांना कारखान्यावर सात दिवस उपोषणादरम्यान त्रास देण्यात आला व त्याच रागातून हा हल्ला त्यांच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करावी; अन्यथा आंबेगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असेही बालवडकर यांनी सांगितले. या वेळी अ‍ॅड. राजू बेंडे पाटील, वनाजी बांगर, सचिन बांगर, अशोकराव काळे, राजू घोडे, बाळासाहेब बाणखेले, अमोल वाघमारे, अमरसिंह कदम, अजित चव्हाण आदींची भाषणे झाली.

Back to top button