Pune Road News : डीपी रस्त्यांचे घोंगडे भिजत! महंमदवाडी परिसरातील समस्या

Pune Road News : डीपी रस्त्यांचे घोंगडे भिजत! महंमदवाडी परिसरातील समस्या

कोंढवा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महंमदवाडी परिसरातील डीपी रस्ते विकसित झालेले नसल्यामुळे परिसराचा बकालपणा वाढला असून, मूलभूत सोयीसुविधांच्या उणिवा जाणवत आहेत. या रस्त्यांसाठी जागा देण्यास शेतकरी तयार आहेत. मात्र, प्रशासन याबाबत उदासीन असल्याने गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून डीपी रस्त्यांचे घोंगडे भिजत पडलेले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महंमदवाडी परिसराचा 1997 साली महापालिकेत समावेश झाला. 2002 ते 2007 या कालावधीमध्ये परिसरातील डी. पी. रस्ते आखले गेले. तेव्हापासून परिसरातील काही मुख्य डी.पी. रस्ते विकसित झालेच नाहीत. यामुळे हा परिसर विकासात मागे पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे. डीपी रस्ते वेळेत पूर्ण झाले असते, तर कोट्यवधीचा महसूल महापालिकेला मिळाला असता. परिसरातील शेतकरी या प्रकल्पासाठी जागेचा ताबा देण्यास तयार आहेत. परंतु, महापालिका प्रशासन मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

डीपी रस्ते रखडल्यामुळे परिसरातील नागरिक विकासापासून वंचित राहिले आहेत. महापालिकेत समाविष्ट होताना 25 वर्षांपूर्वी रहिवाशांनी परिसराच्या विकासाची स्वप्ने पाहिली, ती अद्यापही अपूर्ण आहेत. या भागात दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक वैतागून गेले आहेत.

महंमदवाडी परिसराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून, सध्याचे रस्ते दळणवळणासाठी सर्वच बाजूंनी कमी पडत आहेत. पालखी मार्गही अर्धवट अवस्थेत आहे. या भागात वाहनांचे तर सोडा, लोकांना पायी चालणेदेखील अवघड आहे. महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी अद्यापही पुरेसा विकास झाला नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news