दौंड भाजी मंडईतील स्वच्छतागृहांची दुरवस्था | पुढारी

दौंड भाजी मंडईतील स्वच्छतागृहांची दुरवस्था

दौंड : पुढारी वृत्तसेवा :  दौंड शहरातील भाजी मंडईतील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली असून, दौंड नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात फक्त भाजी मंडई येथे नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून महिला व पुरुषांकरिता स्वच्छतागृहे बांधली आहेत. शहरात फक्त याच ठिकाणी विक्रेते, ग्राहक यांच्याकरिता ही स्वच्छतागृहे बांधली होती. या स्वच्छतागृहांची सध्या दुरवस्था झालेली आहे. स्वच्छतागृहाकडे जाणारा रस्ता प्रचंड घाणीने व मलमूत्राने व्यापलेला आहे. या स्वच्छतागृहात जाण्याकरिता मलमूत्र तुडवत जावे लागते, अशी परिस्थिती आहे. एकीकडे शासन स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे,यावर खर्चदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. मग याला दौंड अपवाद आहे का? असा सवाल दौंडकर नागरिक करू लागले आहेत.

संबंधित बातम्या : 

या स्वच्छतागृहाची पाण्याची टाकी, नळ, टाकीत पाणी जाण्याकरिता बसवलेली मोटार, दरवाजे चोरट्यांनी चोरून नेलेले आहेत. दौंड नगरपालिकेने याची देखभाल करण्याकरिता सुरक्षारक्षकाचा ठेका दिला होता, परंतु या ठिकाणी कधीही सुरक्षा रक्षक दिसलेला नाही. फक्त राजकीय नेत्याचे हित जपायचे म्हणून सुरक्षेची ठेका दौंड शहरात दिलेला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. येथे असलेल्या हातपंपाची तर खूपच दयनीय अवस्था झाली आहे. या हातपंपाचा दांडादेखील लोकांनी चोरून नेला आहे. या हातपंपाशेजारी मलमूत्र साचलेले दिसत आहे.

याबाबत दौंड नगरपालिकेचे आरोग्याधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक शाहू पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, की आम्ही नेहमी तेथे स्वच्छता करतो, परंतु येथील भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, या स्वच्छतागृहांची साफसफाई होतच नाही. दौंड नगरपालिकेकडे येथील अनेक भाजीविक्रेत्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत, परंतु सुस्त पडलेले नगरपालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दौंड शहरात या अस्वच्छ स्वच्छतागृहाशिवाय शहरात दुसरे एकही स्वच्छतागृह नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, तसेच बाहेरगावावरून आलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नगरपालिकेकडे अनेकदा याबाबत तक्रारी करून देखील नगरपालिकेने या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या आहे. मागील तीन-चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने नागरिक खुल्या रस्त्याच्या कडेला लघुशंकेकरिता सर्रासपणे उभे राहत आहेत.

Back to top button