आरोग्य क्षेत्रात भरणार पाच हजार कंत्राटी कर्मचारी

आरोग्य क्षेत्रात भरणार पाच हजार कंत्राटी कर्मचारी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या 27 शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद/होमीओपॅथी महाविद्यालये व रुग्णालयांतील कुशल, अकुशल व अर्धकुशल अशी 'क' आणि 'ड' गटांतील एकूण 5 हजार 56 पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यासाठी सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे. सेवा पुरवठादाराला पुढील पाच वर्षे मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट दिले आहे. पुरवठादाराने मनुष्यबळ मानधनाची देयके दरमहिन्याला संबंधित संस्थेकडे सादर करावीत. तसेच संबंधित संस्थांनी देयके तपासून संस्थेच्या कंत्राटी सेवा या उद्दिष्टांतर्गत उपलब्ध तरतुदीतून नियमानुसार परस्पर द्यावीत, असे स्पष्ट केले आहे.

बाह्ययंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचा-यांस देय संविधानिक वसुलीच्या रकमा संबंधित कर्मचा-याच्या वेतनचिठ्ठीमध्ये स्पष्टपणे नमूद करून त्यानंतर त्या संबंधित प्राधिकरणाकडे जमा करणे आवश्यक आहे. मनुष्यबळाच्या वर्गवारीमध्ये या विभागाच्या अधिनस्थ संस्थेतील कुशल, अर्धकुशल व अकुशल पदांचा समावेश नसल्यास हा विभाग कामगार विभागास तत्काळ माहिती देईल आणि कामगार विभागाकडून मनुष्यबळाच्या वर्गवारीच्या नजीकतम मनुष्यबळ वर्गवारी तसेच वर्गवारीनुसार देण्याचे दर निश्चित करून घेईल.

मनुष्यबळ पुरवठा करणा-या एजन्सीने शासनाने वेळोवेळी केलेले नियम व उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या अटी व शर्ती यांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट केले आहे. यामुळे अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रातील कायमस्वरूपी भरतीची वाट पाहणार्‍या स्पर्धा परीक्षार्थींच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news