शरीरातील वात बिघडलाय, आहारात ‘या’ पदार्थांचे प्रमाण कमी करा

शरीरातील वात बिघडलाय, आहारात ‘या’ पदार्थांचे प्रमाण कमी करा

Published on

प्रत्येकाच्या शरीरात वात असतोच; पण अयोग्य आहारामुळे तो बिघडला की, वातविकार सुरू होतात. तो होऊ नये, यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

शरीरातील वात वाढला की तो दोष ठरतो. पण, मूलत: वात हा प्रत्येकाच्या शरीरात असतो. शरीरातील सर्व लहान मोठ्या हालचाली वातामुळेच होत असतात. अन्नग्रहण, अन्नपचन, मलमूत्र विसर्जन, श्वासोच्छास, धावणे, पडणे, चालणे, अशा प्रत्येक हालचाली वातामुळेच होतात. सर्व शरीरात संचार करीत असणारा वात अयोग्य आहारामुळे बिघडतो आणि त्यामुळे निरनिराळे आजार होतात. त्याला आपण वात विकार असे म्हणतो. शरीरातील वात विविध कारणांमुळे बिघडतो.

कमी पोषण असणारे कोरडे, थंड अन्नपदार्थ खाणे, जेवणाच्या वेळा निश्चित नसणे, खूप जास्त उपवास करणे, अनियमित प्रमाणात जेवणे, थंड जागी काम करणे, थंडी वार्‍यात प्रवास करणे, सतत गार पाण्याने आंघोळ करणे, पंख्याखाली झोपणे, अतिप्रमाणात व्यायाम, जास्त जागरण, चिंता, क्रोध यासारखे मनोविकार, थंड हवामान यासारख्या बाह्य कारणांमुळे शरीरातील वात बिघडतो. तसेच वयाच्या पन्नाशीनंतर नैसर्गिकपणे वात बिघडतो.

वात बिघडल्यानंतर शरीरात निरनिराळ्या ठिकाणी वेदना होणे, चमक येणे, सांधे जखडल्यासारखे वाटणे, पोट साफ न होणे, अंग दुखणे, हात पाय कापणे ही लक्षणे अधुनमधून जाणवू लागतात. ही वात बिघडल्याची सुरुवात असते. वात बिघडल्यास माणसाला 80 प्रकारांचे विविध विकार होऊ शकतात. यापैकी काही लक्षणाच्यारूपात दिसतात आणि सौम्य असतात तर काही मोठे त्रासदायक असतात. सौम्य स्वरूपाच्या वात विकारांमध्ये हातापायाला भेगा पडणे, पाय दुखणे, पाय बधिर होणे, घोटा सुजणे, पायात गोळे येणे, कंबर दुखणे, पाय गळून जाणे, ओटीपोट फुगणे, पाठ-खांदे जखडणे, छाती दाटणे, घसा दुखणे, ओठ फुटणे, डोळे दुखणे, दात दुखी किंवा दात तुटणे, डोके दुखणे, डोळे तारवटणे, चक्कर येणे, अंधारी येणे यासारखे विकार बिघडलेल्या वातामुळेच होत असतात. याबरोबरच जास्त बडबडणे, मन उदास होणे, जांभया येणे, लक्ष न लागणे, चंचलपणा या तक्रारीही वात बिघडल्यामुळे निर्माण होतात.

वात विकार बिघडल्यास मोठे विकारही उद्भवतात. यामध्ये सांध्यांचे विकार, आमवात, अर्धे अंग लुळे पडणे, कंबर दुखणे, पायात मुंग्या येणे, पाय जड होणे, सायटिका, मान दुखून खांदे सुजणे, झटके येणे, खांदा जखडणे, बारीक होणे, टाच दुखी, तोंड वाकडे होणे, बोलता न येणे, ऐकू न येणे इत्यादी बर्‍याच तक्रारींचा समावेश आहे.

वात विकारावर औषधी तेलाने मसाज हा अतिशय उपयुक्त इलाज आहे. अर्थात यामध्ये व्यक्तीचे वय, प्रकृती या सर्व गोष्टींचा विचार करून औषधी तेल वापरावे लागते. वेगवेगळ्या औषधी काढ्याने, वाफेने, पाल्याने, पुरचुंडीने शेक घेणे हादेखील उपचार यामध्ये प्रभावी ठरतो. वातविकार असणार्‍यांनी आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पथ्यपालनाबाबत दक्षता बाळगणे गरजचे असते. आहारात जड अन्नपदार्थ, तेलकट, तुपकट पदार्थ, मीठ यांचे प्रमाण कमी करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news