Sassoon Drug case : ससून ड्रग्ज प्रकरणी पोलिसाची भूमिका संशयास्पद? लिफ्ट असताना जिन्याचा वापर

Sassoon Drug case : ससून ड्रग्ज प्रकरणी पोलिसाची भूमिका संशयास्पद? लिफ्ट असताना जिन्याचा वापर

पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणात गार्ड ड्युटीवर असलेल्या 'त्या' पोलिसाची भूमिका संशयास्पद असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दै.'पुढारी'शी बोलताना सांगितले. पाटीलने पळ काढल्यानंतर गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांच्या पथकाबरोबरच अतिवरिष्ठ अधिकार्‍यांनी ससून रुग्णालयात धाव घेतली. त्या वेळी त्या पोलिसाची चौकशी करण्यात आली असून, त्याच्या हातून पाटील कसा फरार झाला याचा डेमो घेतला. त्या वेळी अनेक सवाल उपस्थित झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत हे अधिकारी ससून रुग्णालयात तळ ठोकून होते.

ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील ललित पाटील हा मुख्य आरोपी आहे. वैद्यकीय उपचारासाठी त्याला येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात दाखल केले होते. चार महिन्यांपासून तो तेथे होता. या कालावधीत त्याने थेट ससूनमधूनच अमली पदार्थांची विक्री करण्यास सुरुवात केली. शनिवारी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने त्याच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्याच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली. मात्र, पाटीलवर उपचार सुरू असल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिस त्याला ताब्यात घेणार होते. त्यापूर्वीच त्याने सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास पोलिसाच्या हातावर तुरी देऊन रुग्णालयातून पळ काढला.

पाटीलला ससून रुग्णालयातील कैद्यांसाठी आरक्षित असलेल्या वार्ड क्रमांक सोळामध्ये ठेवले होते. त्याला क्षयरोग असल्याचादेखील संशय होता. तर मंगळवारी त्याचे हार्नियाचे ऑपरेशन होते. त्यासाठी एक्स-रे काढण्यासाठी त्याला सांगण्यात आले. हेच पोलिस कर्मचारी त्याला एक्स-रे काढण्यासाठी घेऊन निघाले होते. तेथून तळमजल्यावर जाण्यासाठी तीन लिफ्ट आहेत. मात्र, ते जिन्याने खाली गेले. पाटील मोठा ड्रग्ज तस्कर असल्याचे माहिती असतानाही त्याच्या हाताला पोलिसांनी बेडी लावली नाही.

तळमजल्यावर दाखल होताच पाटीलने पोलिसाच्या हाताला धक्का मारून पळ काढला, असे त्यांचे म्हणणे आहे. पाटील पळाला तेव्हा कर्मचार्‍याने आरडाओरडा करणे गरजेचे होते. त्यांनी तसे केले नाही. त्यानंतर पोलिस कर्मचारी दुचाकी शोधून पाटीलचा पाठलाग करत होते. तोपर्यंत पाटीलने रिक्षातून पळ काढला होता. त्याने लेमन ट्री हॉटेल गाठले. तो हॉटेलमध्ये जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

डोक्याला टोपी, अंगात काळे जाकेट, तोंडाला मास्क असा पेहराव पाटीलने केला आहे. पाटील हा लेमन ट्री हॉटेलमध्ये 7 वाजून 47 मिनिटांनी पोहोचल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यानंतर हे पोलिस कर्मचारीदेखील त्याच हॉटेलमध्ये 8 वाजून 50 मिनिटांनी म्हणजेच तब्बल एक तासाने दाखल होताना दिसत आहेत. पोलिस कर्मचारी कानाला फोन लावून आरामात बोलत येताना दिसत आहेत. गंभीर बाब म्हणजे पाटीलने पळ काढल्यानंतर हे कर्मचारी 9 वाजेपर्यंत कोणालाही याची माहिती देत नाहीत. त्यामुळे ड्रग्ज तस्कर पाटील पळाला की पळवला, असा सवाल उपस्थित होत आहे.

पाटीलच्या शोधासाठी राज्यभर आठ पथके

ड्रग्ज तस्कर पाटीलने पळ काढल्यानंतर गुन्हे शाखेची तब्बल आठ पथके त्याच्या शोधासाठी पाठवली आहेत. नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकणसह इतर ठिकाणी त्याचा शोध घेतला जात आहे.

पासपोर्ट जप्त

पाटीलने विदेशात पळ काढू नये, म्हणून नाशिक येथील त्याच्या घरातून पुणे पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला आहे. चौकशीसाठी त्याच्या काही नातेवाइकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, त्याचा भाऊदेखील फरार झाला आहे. पाटील ससून रुग्णालयात वापरत असलेले मोबाईल सीम कार्ड त्यानेच नाशिक येथून आणून दिले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news