पुणे पोलीस दलात खळबळ! एका अधिकार्‍यासह 9 कर्मचारी निलंबित | पुढारी

पुणे पोलीस दलात खळबळ! एका अधिकार्‍यासह 9 कर्मचारी निलंबित

पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणात एका अधिकार्‍यासह 9 पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. ससून रुग्णालयात उपचार घेत असताना पाटील तेथूनच ड्रग्ज रॅकेट चालवत होता. सोमवारी रात्री एक्स-रे काढण्यासाठी आणल्यानंतर त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. ललित पाटील ड्रग्ज विक्री प्रकरणात 4 कर्मचारी, तर पाटील याने ससूनमधून पलायन केल्याप्रकरणी महिला अधिकार्‍यासह 5 जणांना निलंबित करण्यात आले आहे.

सहायक फौजदार जर्नादन काळे, पोलिस कर्मचारी विशाल टोपले, स्वप्निल शिंदे आणि दिगंबर चंदनशिव, अशी ड्रग्ज रॅकेट प्रकरणात निलंबित केलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. तर, पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, पोलिस नाईक नाथाराम काळे, पीरप्पा बनसोडे आणि अमित जाधव, अशी ललित पाटील पलायन प्रकरणात निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दोन वेगवेगळे आदेश काढले आहेत. ससून रुग्णालयात ड्रग्ज आल्या प्रकरणात चौघा कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. ससून रुग्णालयात आलेल्यांकडील संशयास्पद वस्तू तपासण्याची जबाबदारी या चौघांकडे होती. तरीही ससून रुग्णालयात ड्रग्ज आणले गेले. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चौघांना निलंबित करण्यात आले आहे.पाटील हा ड्रग्ज माफिया आहे.

त्याच्या बंदोबस्तासाठी कोर्ट पार्टी नियुक्त करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच ससून रुग्णालयात 2 कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले होते. त्यात ललित पाटील हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. त्याच्याकडे दोन महागडे मोबाईल आढळून आले होते. त्याच्याकडे चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेने ससून रुग्णालय व कारागृहाकडे पत्र दिले होते. अशा महत्त्वाच्या आरोपीच्या बंदोबस्तासाठी पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे व इतरांची नेमणूक करण्यात आली होती. असे असताना पाटील याला एक्स-रे काढण्यासाठी तळमजल्यावर आणण्यात येत असताना ललित पाटील हा पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळून गेला.

हेही वाचा

कोल्हापूर : गाय दुधाच्या खरेदी दरात कपात केल्याबद्दल ‘गोकुळ’समोर निदर्शने

Supriya Sule : राज्य देवाच्या भरवशावर, सरकार घरे फोडण्यात व्यस्त : सुप्रिया सुळे

AsianGames2023 : ३५ किमी शर्यतीत मंजू राणी आणि राम बाबूची कांस्य पदकावर मोहर

Back to top button