Pune news : सुट्यांच्या ‘वीकेंड’मधून खेड शिवापूर टोल ‘पास’ | पुढारी

Pune news : सुट्यांच्या ‘वीकेंड’मधून खेड शिवापूर टोल ‘पास’

नसरापूर/ खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : जोडून आलेल्या सलग सुट्या संपल्याने चाकरमानी कामाच्या ठिकाणी परतू लागल्याने सोमवारी ( दि. 2 ) दुपारपासून पुणे – सातारा महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, टोल प्रशासानाने नियोजनबद्ध उपाययोजना केल्याने वाहनाची संख्या अधिक असूनही या टोलवरून वाहने लवकर पास होत होती. गणेश विसर्जन, ईद-ए-मिलाद तसेच शनिवार, रविवार व महात्मा गांधी जयंतीनिमित्त सलग पाच दिवसांची सुट्यांचा वीकेंड पडल्याने कुटुंबीयांसह गावाकडे गेलेले चाकरमानी व पर्यटक सुटी संपल्याने परतीच्या प्रवासाला लागले. मंगळवारपासून कामावर हजर होण्यासाठी शहराकडे रवाना होत होते. यामुळे पुणे – सातारा महामार्गावरील सारोळा, धांगवडी, चेलाडी, कोंढणपूर, वेळू येथील उड्डाणपुलावर वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. सजग प्रवासी चालकांनी कापूरहोळ, खेड शिवापूर या पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली होती.

संबंधित बातम्या : 

सातारा बाजूकडून पुणे, मुंबईकडे जाणार्‍या वाहनांची संख्या वाढल्याने टोल प्रशासनाचे अधिकारी अमित बाठीया, बद्रीप्रसाद शर्मा, संदीप कोंडे, सिद्धार्थ गोडबोले, मोहन धुमाळ, अभिजित गायकवाड, टोलचालक नवनाथ पारगे यांच्या कर्मचार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेत एकूण 15 लेन पुणे बाजूला खुल्या करून अवजड वाहने, कार, बस यांची वेगळी विभागणी करून लेन टोलवसुलीच्या कामाचा उरक ठेवल्याने वाहने लवकर पास होत होती. विशेषतः सातारा बाजूकडे जाणार्‍या मार्गावर तुरळक प्रमाणात वाहने धावत होती. तर याउलट पुणे बाजूला खेड शिवापूर टोलनाक्यावर सर्व लेन महाउसफुल्लफ झाल्या होत्या. दररोज खेड शिवापूर टोलनाक्यावरून प्रतिदिनी जवळपास 40 ते 50 हजार वाहने धावतात. मात्र, सुट्यांमुळे पुणे बाजूला तब्बल 70 हजार वाहने पास झाल्याचा अंदाज टोल प्रशासनाने वर्तविला आहे.

Back to top button