वडगाव शेरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून पडणार्या पावसामुळे लोहगाव परिसरातील रस्त्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने छोठे, मोठे अपघात होत आहेत. तसेच वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. महापालिका प्रशासनाने परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी,
अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. महापालिकेने काही ठिकाणी डांबर टाकून खड्डे बुजवले होते. मात्र, सध्या होत असलेल्या पावसामुळे हे खड्डे 'जैसे थे' झाले आहेत. याबाबत नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
1. लोहगावातील मुख्य चौकामधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यांत पावसाचे पाणी साचले आहे. बसथांब्यासमोर डबके साचल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
2. शिंदे रस्ता, साठे वस्ती, लोहगाव-वाघोली रस्ता, अशा सर्वच रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. तसेच, अंतर्गत रस्त्यांवरीही खड्डे पडल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहे.
3. रस्त्यांवरील खड्डे, असमतोल, उखडलेले डांबरीकरण आणि ठिकठिकाणी पसरलेली वाळू आणि खडीमुळे वाहनचालक व नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
4. खड्ड्यांमुळे वाहतुकीची गती कमी होत असून, वाहतूक कोंडीही होत आहे. खडड्यांतून वाहने चालवल्यामुळे दुचाकीस्वारांना मणक्याचे विकार होत असल्याच्या तक्रारी पुढे येते आहेत.
लोहगावातील खड्डे दुरुस्त करण्यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. एकच डांबर प्लांट सुरू असल्यामुळे काम होत नसल्याचे अधिकारी सांगतात. गणेशोत्सवाच्या काळात खड्डे दुरुस्त केले होते. परंतु, पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत.
-नेहा शिंदे, रहिवासी
लोहगावातील नागरिकांकडून महापालिका कर वसूल करते. परंतु, मूलभूत सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने परिसरातील समस्या तातडीने सोडविल्या पाहिजे.
– बाळू अहिवळे, रहिवासी
हेही वाचा