Pune News : पावसामुळे पुण्यातील रस्ते खड्ड्यात | पुढारी

Pune News : पावसामुळे पुण्यातील रस्ते खड्ड्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मागील आठवडाभर शहरात होत असलेल्या पावसामुळे शहरातील विशेषतः उपनगरांमधील लहान-मोठ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यांमध्ये वाहने आदळत आहेत. परिणामी, वाहतुकीचा वेग कमी होऊन वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतल्याची माहिती महापालिका अधिकार्‍यांनी दिली आहे.

यंदा संपूर्ण पावसाळ्यात म्हणावा तेवढा पाऊस पडला नसल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच मागील आठवडाभर शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे प्रशासनासह नागरिकांची आणि वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. शहरात अवघा अर्धा-एक तास जरी मुसळधार पाऊस झाला, तरी रस्ते पाण्याखाली जात आहेत. तसेच, शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शहरातील अनेक पुलांवरही खड्डे पडले आहेत.

पावसामुळे रस्त्यांनाच नाल्यांचे स्वरूप येत असल्याने चौकाचौकांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यांमध्ये वाहने आदळत आहेत. यामुळे शहराच्या वाहतुकीचा वेग मंदावत असून, वाहतूक कोंडी होत आहे. दुसरीकडे या खड्ड्यांतून बाहेर पडलेली खडी रस्त्यांवर पसरलेली आहे. त्यामुळे या खडीमुळे दुचाकी वाहने घसरत आहेत. शिवाय पसरलेली खडी, खचलेले चेंबर, यामुळे रस्ते धोकादायक झालेले आहेत.

सोलापूर रस्त्याची चाळण

गोळीबार मैदान ते हडपसर (सोलापूर रस्ता) रस्त्याची चाळण झाली असून, ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. सोलापूर बाजार ते गोळीबार मैदान चौक यादरम्यान एका बाजूचा रस्ता खड्डेमय झाला असून, त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोकाही आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण सिंहगड रस्त्यावर रोड मेंटेनन्सच्या 15 व्हॅनमधून खड्डे बुजविण्याचे काम केले जाणार आहे.

– विकास ढाकणे,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका

हेही वाचा

Pune Sasoon Hospital : पुण्यातील गुन्हेगारांसाठी ’ससून’ मोकळे रान? ‘त्यांना’ हवी कैदी पार्टीची क्रीम ड्युटी

Weather Update : राज्यातला मोठा पाऊस ओसरला; 8 ऑक्टोबरपर्यंत कोकणातच हलका पाऊस

Harpal Randhawa : भारतीय उद्योगपतीचा झिम्बाब्वेत विमान अपघातात मुलासह मृत्यू

Back to top button