कराड : वन्यजीवांच्या अवयवांसह बिबट्याचे कातडे जप्त | पुढारी

कराड : वन्यजीवांच्या अवयवांसह बिबट्याचे कातडे जप्त

कराड, पुढारी वृत्तसेवा : ओगलेवाडी (हजारमाची, ता. कराड) परिसरातील एका घरावर पुण्याच्या वनविभागाने सोमवारी छापा टाकला. झडतीमध्ये घरात बिबट्याची कातडी, भेकर आणि हरणांची शिंगे तसेच इतर संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. वन्य प्राण्यांचे अवयव, इतर वस्तू वनविभागाने जप्त केल्या आहेत.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणालगत असलेल्या मांडवी बुद्रूक गावातील एका फार्म हाऊसमध्ये शिकार केलेला बिबट्या ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ आणि पथकाने संबंधित फार्म हाऊसवर छापा टाकला. तेथून बिबट्याच्या नख्यांसह पंजे जप्त केले. त्याप्रकरणी डेक्कन जिमखाना परिसरातील दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित संशयितांचे मूळगाव हजारमाची (ता. कराड) आहे. त्यामुळे पुण्याचे वनाधिकारी सपकाळ यांच्यासह त्यांच्या पथकाने सोमवारी हजारमाचीत संशयितांच्या घरावर छापा टाकला.

त्यावेळी त्यांना अनेक संशयास्पद गोष्टी हाती लागल्या आहेत. बिबट्याची कातडी, गवा, हरण व भेकराची शिंगेही सापडली आहेत. वनविभागाने वन्यजीवांचे हे अवयव जप्त केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याने याबाबत अधिक तपशील समजू शकला नाही.

Back to top button