दहा एकर क्षेत्रावर फुलवली गुलाबाची फुलशेती ; कुटुंबाला दिला आर्थिक सुगंध | पुढारी

दहा एकर क्षेत्रावर फुलवली गुलाबाची फुलशेती ; कुटुंबाला दिला आर्थिक सुगंध

हनुमंत वाघले

नायगाव : हाती आलेले पीक डोळ्यांसमोर नाहीसे होताना पाहण्याची वेळ अनेकदा शेतकर्‍यांवर येते. मात्र, सततच्या पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करीत यश गाठतात. रानमळ्यातील नरेंद्र कुदळे या शेतकर्‍याने असाच काहीसा पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीने गुलाबाच्या फुळशेतीत वेगवेगळे प्रयोग करून आपल्या कुटुंबाला आर्थिक सुगंध देण्याचा प्रयत्न केला आहे. पुरंदर तालुक्यातील रानमळा येथील नरेंद्र कुदळे या शेतकर्‍याची यशोगाथा इतर शेतकर्‍यांना प्रेरणा देणारी आहे. नरेंद्र कुदळे यांनी 1992 मध्ये टेल्को कंपनीतील कायम नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला घरच्या दोन एकर शेतीमध्ये कुदळे यांनी डाळिंब पिकापासून ऊसशेती करीत शेतीसोबतच कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. एवढ्यावरच न थांबता इतर शेतकर्‍यांपेक्षा काहीतरी वेगळा प्रयोग शेतात करायचा, हा मानस त्यांना शांत बसू देत नव्हता.
दरम्यान, गुलाबाच्या शेतीचा अनुभव नसतानाही अभ्यास करून खडतर सुरुवात केली. कष्ट करण्याची जिद्द, तयारी याच्या जोरावर सुरुवातीला दोन एकरमध्ये साधारण सहा हजार गुलाबाच्या रोपांची लागवड केली. यातून सुरू झालेल्या उत्पन्नातून घरची परिस्थिती बदलत गेली. यामुळे इतरत्र वेळ वाया न घालवता रात्रंदिवस शेतातच राबून आधुनिक पद्धतीने गुलाबशेती करण्यावर भर दिला. यामुळे कुदळे यांची घरची परिस्थिती बदलली. कुदळे यांची गुलाबाची शेती पाहून आज संपूर्ण रानमळ्यात गुलाबशेती केली जाते.

संबंधित बातम्या : 

नोकरीपेक्षा मिळते अधिक उत्पन्न
नरेंद्र कुदळे यांनी दोन एकरांपासून केलेल्या डाळिंबाची शेती ते आज 15 एकर गुलाबाची शेती, असा प्रवास थक्क करणारा आहे. नरेंद्र कुदळे यांची शेती करण्याची पद्धत पाहून परिसरातील शेतकर्‍यांनी त्यांचा बोध घेतला आहे. मशागत, खुरपणी, औषध फवारणी, मजूर, खते यांचा खर्च वजा जाता महिन्याला गुलाबशेतीतून नोकरीपेक्षा चांगले उत्पन्न मिळत असल्याचे कुदळे यांनी सांगितले.

Back to top button