Pune News : आदिवासी जनतेचे हक्क हिरावण्याचे षडयंत्र : पवार | पुढारी

Pune News : आदिवासी जनतेचे हक्क हिरावण्याचे षडयंत्र : पवार

लेण्याद्री : पुढारी वृत्तसेवा :  जल-जंगल-जमीन या पर्यावरणीय त्रिसूत्रीवर आदिवासी समाज काम करीत असून, त्यांचे हक्क हिरावण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला. जुन्नर येथे बिरसा बि—गेड (सह्याद्री, सातपुडा) आयोजित आदिवासी अधिकार परिषदेत ते बोलत होते. आदिवासी हे देशातील मूळ रहिवासी असून, काही मंडळी त्यांना वनवासी म्हणून दूर ढकलण्याचे पाप करीत आहेत. सध्या मध्य प्रदेश, मणिपूर तसेच इतर राज्यांतही आदिवासी समाजावर अत्याचार वाढले आहेत. येत्या निवडणुकीत तुम्ही या विघातक शक्तींना त्यांची जागा दाखविणार का? असा प्रश्न त्यांनी यावे ळी उपस्थितांना विचारला. या प्रसंगी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या भव्य मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली.

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या मैदानावर आयोजित या मेळाव्याचे स्वागताध्यक्षपद आमदार अतुल बेनके यांच्याकडे होते. या वेळी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांसह महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव दीपक बावरिया, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार राजीव तोडसाम, आमदार किरण लहामटे, आमदार आमशा पाडवी, प्रवीण पारधी आदींनी आदिवासी बांधवांना संबोधित केले. या वेळी ’विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, आमदार अशोक पवार, देवदत्त निकम, अशोक घोलप, बिरसा बि—गेडचे काशिनाथ कोरडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शुभम भवारी, भीमसिंग मसानिया, परेश वसावा, भारत तळपाडे, जोरावर पारधी, भुरासिंग पटेल तसेच हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.

मुस्लिम आणि आदिवासींनी एकत्र येण्याची गरज : मौलाना रेहमान सज्जाद नोमानी
स्वातंत्र्यलढाईत सर्वाधिक बलिदान मुस्लिम क्रांतिकारांनी दिले असून, त्याची नोंद दिल्ली येथील स्मारकावर आहे. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मुस्लिम आणि आदिवासींनी लढा दिला होता. आता मात्र पुन्हा एकदा देशाला आझादी मिळवून द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष पवार यांच्या नेतृत्वात ही लढाई लढणार का? असा सवाल ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते मौलाना रेहमान सज्जाद नोमानी यांनी उपस्थितांना केला. आदिवासी आणि मुस्लिम समाजाने एकमेकांच्या उत्सव-सणांमध्ये सहभागी होऊन भाईचारा वाढवावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

आदिवासी हक्कांवर गदा येणार?
मोदी सरकार समान नागरी कायद्याच्या आडून आदिवासींचे कायदे कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आदिवासींची जमीन धनदांडग्यांना देण्याच्या हालचाली सुरू असून, 370 कलामानंतर आता हे सरकार आदिवासीविरोधात कायदे करण्याच्या तयारीत आहे. राज्याच्या विविध आदिवासी भागांत बेकायदा उत्खनन सुरू असून, सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. आदिवासी जनतेच्या हक्कांचा आदर करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हेच आमचे पालक आहेत, असे बिरसा बि—गेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम यांनी या वेळी सांगितले.

15 रोजी स्मारकाचे भूमिपूजन : आ. बेनके
आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन येत्या 15 नोव्हेंबर रोजी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी होणार आहे, अशी घोषणा बेनके यांनी या वेळी केली. सरकारने धनगर समाजाला आरक्षण देताना जर आदिवासी कोट्याला धक्का दिला, तर सर्वप्रथम राजीनामा देणार, अशी ग्वाही बेनके यांनी दिली. सध्या ग्लोबल वॉर्मगिंबाबत नुसत्या चर्चा सुरू आहेत. मात्र, नैसर्गकि संपत्ती जपण्याचे खरे काम आदिवासी बांधव शेकडो वर्षांपासून करीत असल्याचे ते म्हणाले.

Back to top button