

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : वाघांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असल्याचा दावा केंद्र सरकारकडून वेळोवेळी केला जात असला तरी गेल्या नऊ महिन्यांत देशात तब्बल 146 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्र दुसर्या क्रमांकावर असून मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.
देशात वाघांच्या विविध अवयवांची तस्करी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत देशात अशा प्रकारची 14 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून गेल्या कित्येक वर्षांमधील हा उच्चांक असल्याचे सांगण्यात आले.
चालू वर्षामध्ये 28 सप्टेंबरपर्यंत मध्य प्रदेशात सर्वाधिक म्हणजे 34 वाघांचा बळी गेला आहे. त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक असून महाराष्ट्रात 32 वाघांचा बळी गेला आहे. उत्तराखंडमध्ये 17 वाघांचा बळी गेला आहे. त्यापाठोपाठ आसाम (11), कर्नाटक (9) आणि राजस्थान (5) या राज्यांचा क्रमांक लागतो. या सर्व बळींचा विचार केला तर त्यात 24 बछडे होते. तसेच यातील 70 वाघ देशभरातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये राहात होते, असेही समोर आले आहे.
अकरा वर्षांतील उच्चांक
यावर्षी सप्टेंबरमध्येच वाघांच्या मृत्यूने गेल्या 11 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. 2012 मध्ये देशात 88 वाघांचा बळी गेला होता. त्यानंतर 2013 मध्ये 68, 2014 मध्ये 78, 2015 मध्ये 82, 2016 मध्ये 121, 2017 मध्ये 117, 2018 मध्ये 101, 2019 मध्ये 96, 2020 मध्ये 106, 2021 मध्ये 127 आणि 2022 मध्ये 121 वाघांचा मृत्यू झाला होता.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एवढ्या वाघांचा बळी जाण्यामागे नैसर्गिक आणि अनैसर्गिक अशी दोन्ही कारणे आहेत. अनेकदा अपघात होऊन वाघांचा बळी जातो, तर काही वेळा वाघांची आपसात भांडणे होऊन त्यातही वाघ मृत्युमुखी पडतात. वाघांची वाढत चाललेली शिकार हा चिंतेचा विषय आहे. वाघांची कातडी आणि नखे दुर्मीळ असल्यामुळे वाघांवर विषप्रयोगही केला जातो.