Pune News : लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! पुण्यात गंभीर समस्या | पुढारी

Pune News : लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! पुण्यात गंभीर समस्या

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत काळापासून खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, सिंहगड रोड परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. ड्रेनेज लाइनची दुरुस्ती करूनही सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ड्रेनेज लाइन तुंबत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

वर्षानुवर्षे नांदेड, खडकवासला, किरकटवाडी आदी ठिकाणी ड्रेनेज लाइन तुंबण्याची समस्या कायम आहे. कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता मैलापाण्यासह कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी ओढे व नाल्यांतून थेट मुठा नदीत सोडले जात आहे. लोकसंख्या वाढल्याने या परिसरात मैलापाण्याची समस्या गंभीर बनली आहे. परिसरात जवळपास चार लाख लोकसंख्या आहे. दररोज लाखो लिटर मैलपाणी नदीत सोडले जात आहे. तसेच कचरा, राडारोडाही टाकला जात आहे.

या गावांचा महापालिकेत समावेश होऊनही सांडपाण्याची समस्या कायम आहे. नांदेड येथील मुख्य चौकात ड्रेनेज लाइन फुटल्याने अनेक दिवसांपासून रस्त्यावरून मैलापाणी वाहत आहे. त्याच्याशेजारी असलेल्या जलवाहिनीत मैलापाणी मिसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यंदा अल्पप्रमाणात पाऊस झाल्याने ओढे-नाल्यांसह मुठा नदी पात्रात मैलापाणी साचून राहिले आहे. त्यात कचरा व राडारोड्याची भर पडत आहे. यामुळे नदीसह ओढे-नाल्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

जनआंदोलन करण्याचा इशारा

ड्रेनेज लाइन तुंबत असल्याने या गावांत रोगराईचा धोका वाढला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ड्रेनेज लाइनचे पाणी ओढ्यात किंवा नदीत न सोडता ते थेट मैलापाणी प्रक्रिया केंद्रात सोडण्यात यावे. महापालिका प्रशासनाने ही समस्या न सोडविल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा खडकवासला भाजपचे उपाध्यक्ष रूपेश घुले यांनी दिला आहे.

मैलापाण्यामुळे ओढ्यांच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दोन्ही तीरांवरील हजारो रहिवाशांना नाकातोंडाला रुमाल बांधून ये-जा करावी लागत आहे. या भागातील नागरिकांना घरांचे दरवाजा, खिडक्या बंद कराव्या लागत आहेत.

– नरेंद्र हगवणे, माजी उपसरपंच, किरकटवाडी

या भागात ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या ड्रेनेज लाइन आहेत. गळती बंद करण्यासाठी दुरुस्ती करण्यात येत असून जीर्ण वाहिन्या बदलल्या जात आहेत. सर्व गावांतील मैलापाणी ओढ्यात सोडले जाते. ड्रेनेजचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.

-संदीप खलाटे, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

Khadakwasla Dam : गावांमधील सांडपाणी थेट खडकवासला धरणात

क्रीडा : आधुनिक तंत्रज्ञानाचा वर्ल्डकपमध्ये आविष्कार

Khadakwasla chain : खडकवासला साखळी प्रकल्पात जोरदार पाऊस

Back to top button