क्रीडा : आधुनिक तंत्रज्ञानाचा वर्ल्डकपमध्ये आविष्कार | पुढारी

क्रीडा : आधुनिक तंत्रज्ञानाचा वर्ल्डकपमध्ये आविष्कार

डॉ. दीपक शिकारपूर

तंत्रज्ञानाचा वापर करून क्रिकेट सामन्यांचा अनुभव अधिक रोमांचक आणि माहितीपूर्ण बनवण्यात येईल . अ‍ॅनिमेटेड ग्राफिक्सचा वापर सामन्यादरम्यान खेळाडूंच्या हालचालींचे विश्लेषण करण्यासाठी करण्यात येईल. यामुळे प्रेक्षकांना खेळाचे बारकावे अधिक चांगले समजण्यास मदत होईल. क्रिकेट सामन्यांचे आयोजन आणि व्यवस्थापन अधिक सुलभ करण्यासाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.

येत्या 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत स्पर्धेतील सामने होतील. हा पहिला विश्वचषक असेल की, जो पूर्णपणे भारतात आयोजित करण्यात आला आहे. या आधीचे विश्वचषक शेजारील देशांबरोबर (पाकिस्तान , श्रीलंका) खेळवले गेले होते. आजकाल नवतंत्रज्ञान सर्वांच्याच जीवनात पूर्णपणे भिनले आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यामध्ये एलईडी स्क्रीन, व्हिडीओ रिप्ले, अ‍ॅनिमेटेड ग्राफिक्स आणि इतर अनेक तंत्रज्ञानांचा समावेश आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून क्रिकेट सामन्यांचा अनुभव अधिक रोमांचक आणि माहितीपूर्ण बनवण्यात येईल. अ‍ॅनिमेटेड ग्राफिक्सचा वापर सामन्यादरम्यान खेळाडूंच्या हालचालींचे विश्लेषण करण्यासाठी करण्यात येईल. यामुळे प्रेक्षकांना खेळाचे बारकावे अधिक चांगले समजण्यास मदत होईल.

याव्यतिरिक्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर क्रिकेट सामन्यांचे आयोजन आणि व्यवस्थापन अधिक सुलभ करण्यासाठीदेखील करण्यात येईल. यामध्ये बॉल ट्रॅकर, फिल्डर ट्रॅकर आणि इतर अनेक तंत्रज्ञानांचा समावेश असेल. पाचशे रुपयांपासून ते 50 हजारांपर्यंतचे तिकीट काढून प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याची गरज नवतंत्रज्ञानाने ठेवली नाही कारण अगदी तसाच अनुभव सुधारत्या तंत्रज्ञानामुळे घरबसल्या मिळू लागला आहे. तसे पाहिले तर ऑनलाईन बुकिंग साईटसवरही कोणत्या आसनावरून खेळपट्टीचे एकंदर द़ृश्य कसे दिसेल, याचे पूर्वावलोकन म्हणजेच प्रीव्ह्यू (बुकिंग करण्यापूर्वी) मिळू शकतो, ही नवतंत्रज्ञानाचीच देणगी आहे.

एकच शॉट टीव्हीवर अनेक कोनांतून पाहण्याची सोय झाली, तोदेखील एक्स्पर्ट कॉमेंटसहित. टाकलेला चेंडू गुडलेंग्थऐवजी गुगली किंवा यॉर्कर असता, तर तो फलंदाजाकडे कोणत्या कोनातून आणि किती वेगाने गेला असता व त्याने तो कसा फटकावला असता, अशासारख्या बाबींचे विश्लेषण संगणकीय प्रणालींमुळे तत्काळ होऊ लागले आहे. ‘हॉक आय’ हे या तंत्राचे उदाहरण आहे. वादग्रस्त निर्णयाच्या समस्येतून योग्य मार्ग काढण्यासाठी अम्पायरला साहाय्य करणे, हे या ‘मल्टि-कॅमेरा सिस्टीम’चे खरे काम असले, तरी प्रेक्षकांना घरबसल्या अधिक माहिती देऊन त्यांचा आनंद वाढवणे यासाठीच ती वापरली जाते, असे म्हणता येईल!

थेट प्रक्षेपण पाहण्यातली गंमत वेगळीच असली, तरी काही कारणाने ते शक्य नसलेल्यांना रेकॉर्डेड सामना पाहणे डीटीएच तंत्रज्ञानाने शक्य झाले आहे. विविध कोनांतून सामना दाखवायचा तर मुळात त्याचे चित्रीकरणही तसे व्हायला हवे! त्याकरिता कॅमेरा-अँगल आणि त्यासंदर्भातही नवी साधने, प्रणाली आणि उपकरणे उपलब्ध झाली आहेत. मैदानच्या मध्यभागी खूप उंचीवर असणारे स्पायडर कॅमेरा, स्काय कॅम ही त्याची चांगले उदाहरणे आहेत. सुपर-स्लो मोशन, स्पीडगन, स्टंपमधील कॅमेरे ही इतर उपकरणे पूर्वीपासून आहेतच.

याखेरीज ‘हॉटस्पॉट’ नावाचे इन्फ्रारेड किरणांवर चालणारे तंत्र आहे. त्याचा वापर चेंडूचा बॅटला वा यष्टीला खरोखरीच स्पर्श झाला आहे अथवा नाही, हे ठरवण्यासाठी केला जातो. ‘स्निकोमीटर’ नावाची यंत्रणा याच कामासाठी वापरली जाते. चेंडूचा यष्टी अथवा बॅटला निसटता का होईना स्पर्श झाला की, थोडातरी आवाज येणारच नाही का? (विशेषतः चेंडूचा वेग ताशी 80 ते 100 किमी असताना तर नक्कीच!) हा मीटर यष्टीमधील अतिसंवेदनशील मायक्रोफोनसोबत काम करून आपला निर्णय देतो. शिवाय त्याला, उदाहरणार्थ, बॅटने निर्माण होणारा आवाज आणि ग्लवमुळे उमटणारा आवाज यातील फरकही समजत असल्याने काही प्रश्न उद्भवत नाही.

आणि स्क्रीनवरची ग्राफिक्स? तीदेखील हल्ली सर्वत्र वापरल्या जाणार्‍या ‘इमोटिकॉन्स’ सारखेच काम करून आपली करमणूक करतात. तीच बाब ‘लाईव्ह ग्राफिकल स्कोअरबोर्ड’ची. इथे मात्र कलात्मकता आणि अचूकता यांचा संगम (आणि तोही एक-दोन सेकंदांत) घडविण्यासाठी तंत्रज्ञांची मोठी टीम काम करीत असते! सध्याच्या दिवसात मोबाईल फोनकडे कोणीच दुर्लक्ष करू शकत नाही. क्रिकेट आणि इतरही खेळांची माहिती देणारी अनेक अ‍ॅप्स मोबाईलवर मिळतात. स्मार्टफोनवर तर सामनाही थेट पाहता येतो.

Back to top button