कोल्हापूर : लोकसहभागातून वनराई बंधारे

कोल्हापूर : लोकसहभागातून वनराई बंधारे

कोल्हापूर : पावसाचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असली तरी जिल्ह्यातील काही गावांना उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी आणि जिल्ह्यात नवीन जलस्रोत निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने लोकसहभागातून जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

राज्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीची क्षमता वाढविण्यासाठी व जलस्रोतांची सिंचन क्षमता टिकविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सिमेंट बंधारे, साठवण बंधारे, लघु पाटबंधारे बांधण्यात येतात. याद्वारे पावसाळ्यामध्ये वाहून जाणारे पाणी अडवून ते साठवणुकीचा प्रयत्न केला जातो. त्याच पद्धतीने नाले, ओढ्यांमधील पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी जिल्हा परिषदेने वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. बंधार्‍यासाठी लागणारी सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू आदी लागणारे साहित्य लोकसहभागातून जमा करण्यात येणार आहे.

याकरिता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतींना वनराई बंधार्‍यांचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी महिला बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, अशासकीय संस्था, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. यासाठी तालुका कृषी अधिकार्‍यांवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

श्रमदान तसेच सीएसआरमधून निधीची उपलब्धता करण्याची सूचना गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कृषी अधिकार्‍यांची गावनिहाय नियुक्ती करण्यात येणार आहे. माझी वसुंधरा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व गावामध्ये वनराई बंधारे बंधार्‍याची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत. वनराई बंधार्‍याचे काम सुरू करण्यापुर्वी आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जिओ टॅग फोटो काढण्यात येणार आहेत.

कसा बांधतात बंधारा

प्रवाहाचा उतार व रुंदी लक्षात घेता या बंधार्‍याच्या पायथ्याची रुंदी सुमारे 1.5 ते 2 मीटर असावी. हा बंधारा दोन्ही काठापर्यंत बांधणे आवश्यक आहे. सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये रेती, वाळू भरली जाते. पहिला थर तयार झाल्यावर तसाच दुसरा थर रचण्यात येतो. साधारणतः दोन किंवा तीन थरांनंतर, मातीचा एक थर पसरविण्यात येतो. त्याने रचलेल्या पोत्यांच्या मधील फटी मुजल्या जातात व बंधार्‍याचे सांधे पक्के होतात.

बंधार्‍याचे फायदे

पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविता येते. तसेच अशा प्रकारच्या बंधार्‍यांची साखळी करून जमिनीत मुरवता येते. त्याने पाण्याच्या भूगर्भपातळीत वाढ होते. बंधारे बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक ज्ञानाची गरज नाही. देखभाल, डागडुजी, दुरुस्तीची आवश्यकता नसते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news