Cold Weather : यंदा हिवाळ्यात थंडी कमीच; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Cold Weather : यंदा हिवाळ्यात थंडी कमीच; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अल निनो सकारात्मक असल्याने यंदा हिवाळ्यात तापमान सामान्य पेक्षा जास्त राहणार असून थंडी सरासरी पेक्षा कमीच राहील. तसेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशात 94 टक्के पाऊस झाला. त्यातही ऑगस्टमध्ये 66 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. अल निनो जानेवारी 2024 पर्यंत तीव्र राहणार असल्याने त्याचे परिणाम हिवाळ्यावर दिसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शनिवारी व्यक्त केला.

हवामान विभागाच्या दृष्टीने 30 सप्टेंबर रोजी मान्सून हंगाम संपला. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठीचा अंदाज डॉ.महापात्रा यांनी दिला. हवामान विभागाचे अंदाज का चुकले,यं दाचा पावसाळा कसा राहिला,अल निनोमुळे पाऊस कसा घटला, आगामी हिवाळ्यावर त्याचे काय परिणाम होतील हे मुद्दे त्यांनी विस्ताराने स्पष्ट करुन सांगितले. महापात्रा म्हणाले की, अल निनो जूनपासून सकारात्मक राहिल्याने अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी जे अनुकूल वातावरण लागते ते तयार झाले नाही.

वारंवार तयार होणारे पश्चिमी चक्रवात, कमी दाबाचे पट्टे, तीव्र कमी दाबाचे पट्टे यांचे प्रमाण घटल्याने यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत भारतात सरासरी 94 टक्के पाऊस झाला. जून व ऑगस्ट मध्ये कमी पाऊस झाला. जूनमध्ये बिपोरजॉय वादळ तर ऑगस्टमध्ये कमी दाबाचे पट्टेच तयार न झाल्याने पाऊस घटल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा कडाक्याची थंडी नाही

महापात्रा यांनी सांगितले की, अल निनोचा प्रभाव जानेवारी 2024 पर्यंत राहणार असल्याने तापमान सरासरी पेक्षा जास्त राहील. त्यामुळे हिवाळा कमी जाणवेल. तापमान सामान्य पेक्षा जास्त राहिल. त्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी फार जाणवणार नाही. यंदा थंड हवेच्या लाटांत घट होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये कमी पाऊस

यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधित देखिल पाऊस सरासरीपेक्षा कमी राहिल. भारतीय समुद्री स्थिरांक हा स्थिर आहे शिवाय अल निनो स्थिती तीव्र असल्याने हा परिणाम देशातील बहुतांश राज्यात दिसेल असेही डॉ.महापात्रा यांनी सांगितले.

मान्सून राज्यातून 5 ऑक्टोबरला निघणार

राज्यातून मान्सून 4 किंवा 5 ऑक्टोबरपासून परतीच्या प्रवासाला निघणार आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास उत्तर महाराष्ट्रातून होईल. असे असले तरी पुढील तीन ते चार दिवस पाऊस राहणार आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली.

असा राहिला यंदाचा पावसाळा

संपूर्ण देशः 94 .4 टक्के
(820 मी.मी) जूनः 91 टक्के जुलैः 113 टक्के ऑगस्टः 64 टक्के सप्टेंबर: 113 टक्के

हवामान विभागाचे अंदाज इतर संस्थांना पाठवणार

यंदाच्या पावसाळ्यात हवामान विभागाचे अंदाज का चुकले या प्रश्नावर डॉ.महापात्रा म्हणाले की,आमचे सर्वंच अंदाज चुकले नाहीत. मात्र जे अंदाज चुकले त्यावर आमचे चिंतन व अभ्यास सुरु आहे. तो डेटा आम्ही इतर संशोधन संस्थांकडे पाठवून त्यावर अधिक सखोल अभ्यास करीत आहोत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news