Uday Samant : शिवसेना कुणाच्या बापाची नाही : उद्योगमंत्री उदय सामंत | पुढारी

Uday Samant : शिवसेना कुणाच्या बापाची नाही : उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ही जशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बापाची नाही, तशीच ती इतरही कुणाच्या बापाची नाही. ती केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि त्यांच्या विचाराचे खरे वारस आम्ही आहोत, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत, त्यामुळे खरी राष्ट्रवादी अजित पवार यांची आहे, असेही ते म्हणाले.

पुणे श्रमिक पत्रकार संघात शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत बोलत होते. या वेळी युवा सेनेचे किरण साळी, राहुल कलाटे उपस्थित होते. सामंत म्हणाले, अजित पवार व इतर नेत्यांचे जसे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, तसाच एक व्हिडीओ बाळासाहेब ठाकरे यांचाही व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते काँग्रेससोबत कधीही जाणार नाही म्हणतात. मात्र, काही जण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याने आम्ही वेगळा निर्णय घेतला. शिवसेना आमच्या बापाची आहे, असे आम्ही म्हटलेले नाही.

ती जशी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बापाची नाही, तशीच ती इतरही कुणाच्या बापाची नाही. ती केवळ बाळासाहेब ठाकरे यांची आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असल्याने खरी राष्ट्रवादी अजितदादांचीच आहे, असेही सामंत म्हणाले. शिवसेनेच्या कोणत्या नेत्याला कुठे उमेदवारी द्यायची, हा अधिकार सर्वस्वी एकनाथ शिंदे यांनाच असेल, असेही सामंत म्हणाले.

दाओसमधील 77 टक्के करार यशस्वी

दाओसमध्ये किती करार झाले, किती उद्योग सुरू झाले, याची माहिती देताना सामंत म्हणाले, दाओससाठी 40 कोटी खर्च झाला, असा आरोप खोटा आहे. यासाठी 32 कोटी खर्च आला आहे. ही परिषद 4 दिवसांची होती. येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनला 16 कोटी खर्च आला. प्रसिद्धी 2 कोटी रुपये खर्च झाला. तर 2022 ला प्रसिद्धीसाठी 3.44 कोटी खर्च करण्यात आला. त्या वेळी शिष्टमंडळ छोटे होते. या वेळी शिष्टमंडळ अधिक होते. दाओसमध्ये 1 कोटी 37 लाखाचे करार (एमओयू) झाले. 2022 ला 87 हजार कोटीचे करार झाले होते. 2023 ला 19 करार झाले त्याची रक्कम 1 लाख 37 कोटी, 1 लाख रोजगार मिळणार आहे. 77 टक्के उद्योजकांना देयकार पत्र देण्यात आली.

सामंत उवाच…

  • ठाकरे सरकारच्या काळात 14 महिने कॅबिनेटच्या सबकमिटीची बैठक न झाल्याने रोजगार बुडाले.
  • तिमाहीत आपले राज्य गुंतवणुकीत एक नंबरला राहिले.
  • रोज सकाळी उठून एकनाथ शिंदेंना लक्ष्य करणे चुकीचे.
  • प्रदूषण मंडळाने केवळ एकाच कारखान्याला नोटीस दिली नाही.
  • छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्याचा सुधीर मुनगंटीवारांचा ऐतिहासिक निर्णय. तीन तारखेला करार होणार.
  • आमदार पात्रतेसंबंधीचा निर्णय ठाकरे गटाच्या अर्जांमुळे लांबत आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विदेश दौरा कुणाच्या टि्वटमुळे नव्हे तर नागपुरातील ढगफुटी व राज्यातील आंदोलनांमुळे रद्द झाला.
  • कुणी कुणाच्या पैशावर दौरे केले, हे 25 वर्षांचे काढावे लागेल
  • आम्ही राजकारणात जरी असलो तरी सगळे निर्णय कुटुंब म्हणून एकत्रितरीत्या घेतो, त्यामुळे मी आणि माझे बंधू आम्ही दोघेही एकनाथ शिंदे यांच्यासोबतच आहोत.
  • शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण लवकरच जाहीर करू.

हेही वाचा

कोल्हापूर : जि. प. भरतीसाठी 7 ऑक्टोबरपासून परीक्षा

सोने 1,800 रुपयांनी स्वस्त

सांगली : अवैध वाळू वाहतुक करणारा ट्रॅक्टर जप्त; तिघाजणांवर गुन्हा दाखल

Back to top button