पंजाब पोलिसांची मोठी कारवाई : काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांना अटक, ९ वर्षापूर्वीच्या ड्रग्‍स प्रकरणी घेतले ताब्‍यात | पुढारी

पंजाब पोलिसांची मोठी कारवाई : काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांना अटक, ९ वर्षापूर्वीच्या ड्रग्‍स प्रकरणी घेतले ताब्‍यात

पुढारी ऑनलाईन : पंजाब पोलिसांनी काँग्रेस आमदार सुखपाल सिंह खैरा यांना ताब्यात घेतले आहे. पंजाब पोलिसांनी आज (गुरूवार) सकाळी सुखपाल खैरा यांच्या चंदिगड येथील निवासस्थानी पोहोचून त्यांना ताब्यात घेतले.

या विषयी अधिक माहिती अशी की, पंजाब पोलिसांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोलाथ विधानसभा मतदारसंघातील आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अटक केली आहे. आज सकाळीच पंजाब पोलिसांनी महिला पोलिसांसह चंदीगडमधील सुखपाल सिंह खैरा यांच्या घरावर छापा टाकला. जलालाबाद पोलिसांनी खैरा यांना जुन्या एनडीपीएस प्रकरणात अटक केली आहे. खैरा हे काँग्रेसच्या किसान सेलचे राष्ट्रीय अध्यक्षही आहेत.

खैरा यापूर्वीही वादात सापडले आहेत

खैरा वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 2015 मध्ये त्यांच्यावर अमली पदार्थांच्या तस्करीचा गुन्हा दाखल झाल्याने ते वादात सापडले होते. काही ड्रग्ज तस्करांना अटक केल्यानंतर फाजिल्का कोर्टाने खैरा यांना समन्स बजावले होते. अटक करण्यात आलेल्या तस्करांकडून पोलिसांनी 2 किलो हेरॉईन, 24 सोन्याची बिस्किटे, दोन पाकिस्तानी सिमकार्ड आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. खैरा यांच्यावर त्यांच्या स्वीय सचिवाच्या फोनवरून तस्करांशी बोलल्याचा आरोप आहे.

याआधी खैरा आम आदमी पक्षात होते

सुखपाल सिंग खैरा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2017 मध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता आणि विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवला होता. 2018 मध्ये पंजाब विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून त्यांना हटवण्यात आल्‍यानंतर त्यांनी आम आदमी पक्षा विरूध्द बंड केले आणि जानेवारी 2019 मध्ये पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

 

Back to top button