Pune Rural news : बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी, दोन बकर्‍या ठार | पुढारी

Pune Rural news : बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी, दोन बकर्‍या ठार

सांगवी : पुढारी वृत्तसेवा :  खांडज (ता. बारामती) परिसरातील 22 फाटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी व दोन बकर्‍यांचा मृत्यू झाला. परिसरात बिबट्याचा वावर वाढू लागल्याने शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 22 फाटा येथील अभिजित रामचंद्र जाधव यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर रविवारी (दि. 23) रात्री 10 वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला होता. त्यामध्ये या शेळीचा मृत्यू झाला होता. मात्र, या शेळीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे लवकर समजून आले नव्हते.
दरम्यान, मंगळवारी (दि. 26) मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास माजी सरपंच अनिल शिवाजी आटोळे यांच्या गोठ्यात नर जातीचे दोन बकरे (बालिंगे) यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला, तसेच एक मांजरसुद्धा ठार केले. मंगळवारी सकाळी वन विभागाने घटनास्थळी पाहणी केली असता पायांच्या ठशांवरून हे हल्ले बिबट्यानेच केल्याचे वन अधिकारी शुभांगी लोणकर यांनी सांगितले. घटनास्थळी सांगवी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जगताप यांनीही भेट देऊन मृत शेळ्या-बकर्‍यांसह इतर जनावरांची तपासणी केली.

पिकांना पाणी देणे झाले अवघड
बिबट्याचा वावर वाढल्याने खांडज गावासह शिरवली, सांगवी, निरावागज, माळेगाव कारखाना या भागांतील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अगोदरच या भागांत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने रात्री-अपरात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे बिबट्याच्या वावराने आणखी एक समस्या निर्माण झाली आहे.

या घटनेची सविस्तर माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. सूचना आल्यानंतर संबंधित परिसरात पिंजरा लावणार आहे.
– शुभांगी लोणकर, वन अधिकारी

हेही वाचा : 

Back to top button